गुवाहाटी : हरियाणाच्या कन्या नीतू घनघास आणि साक्षी चौधरी यांनी उपांत्य फेरीत विजय नोंदवित येथे सुरू असलेल्या एआयबीए विश्व यूथ महिला बॉक्सिंग स्पर्धेची शनिवारी अंतिम फेरी गाठली. अनुपमाला मात्र लाईट हेवीवेट (८१ किलो) प्रकारात उपांत्य लढत कठीण गेली. रशियाची अनास्तासिया रिबेक हिच्याकडून ती ५-० अशी पराभूत होताच भारताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. काल तीन खेळाडू तर आज दोन खेळाडूंनी अंतिम फेरीत धडक देताच भारतीय पथकाला पाच सुवर्णपदकांची आशा आहे.कर्मवीर नवीनचंद्र बारडोलाय इनडोअर स्टेडियममध्ये सायंकालिन सत्रात झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतींत भारतीय बॉक्सर सरस ठरले. नीतूने ४-१ ने विजय नोंदविला तर साक्षीने प्रतिस्पर्धी बॉक्सरवर निर्विवाद वर्चस्व गाजविले. सडपातळ पण काटक असलेल्या डावखुºया नीतूने लाईट फ्लाय प्रकारात अवघड आव्हान सर केले. सुवर्णपदकासाठी नीतूची अंतिम फेरीत गाठ पडेल ती कझाकिस्तानची झझिरा उराकबायेव्हा हिच्याविरुद्ध.बँटम प्रकारात (५४ किलो) हरियाणाची आणखी एक बॉक्सर साक्षी चौधरी हिने उपांत्य सामना एकतर्फी जिंकला. जपानची सेना इरी हिला साक्षीने दीड मिनिटाआधी नॉक आऊट केले. साक्षीचा ठोसा इरीच्या थेट जबड्यावर बसताच ती रक्तबंबाळ झाली. रेफ्रीने लढत मध्येच थांंबविण्याचा निर्णय घेत साक्षीला विजयी घोषित केले. अंतिम सामन्यात तिच्यापुढे इंग्लंडची इव्ही जेन स्मिथ हिचे आव्हान असेल.शुक्रवारी भारताच्या ज्योती गुलिया, शशी चोपडा आणि अंकुशिता बोरी यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय महिलांचा आतापर्यंतचे या स्पर्धेतील सर्वश्रेष्ठ प्रदर्शन असेल. २०११ नंतर एकही सुवर्णपदक जिंकले नव्हते. सरजूबाला देवी आघाडीवर होती. २०१५मध्ये भारतीय संघाने फक्त एक कांस्यपदक जिंकले होते.या वेळी भारताच्या पाच महिला सुवर्णपदकाच्या लढतीत आहेत.
विश्व यूथ महिला बॉक्सिंग : नीतू, साक्षी सुवर्णपदकांच्या शर्यतीेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 3:17 AM