भारताची माजी ऑलिम्पिकपटू अंजू बॉबी जॉर्जनं ( Anju Bobby George) सोमवारी एक धक्कादायक माहिती दिली. एका किडनीवर तिनं भारतासाठी दैदिप्यमान कामगिरी केली. तिच्या या माहितीनंतर सर्वांकडून तिचे कौतुक होत आहे. एका मूत्रपिंडाद्वारे आपण २००३च्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत कांस्यपदक पटकावून अन्य स्पर्धामध्येही यश संपादन केले, असा गौप्यस्फोट ऑलिम्पियन लांब उडीपटू अंजू बॉबी जॉर्ज हिने केला आहे.
२००३च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत अंजू बॉबी जॉर्जनं लांब उडीत ऐतिहासिक कांस्यपदक जिंकले होते आणि आतापर्यंत जागतिक स्पर्धेत एकाही भारतीय खेळाडूला ट्रॅक अँड फिल्ड इव्हेंटमध्ये पदक जिंकता आलेलं नाही. अंजू ही एकमेव खेळाडू आहे. ''२०००च्या ऑलिम्पिक स्पर्धेत मला दुखापतीमुळे मुकावे लागले होते. तेव्हा मला हे कळलं... मी कशीबशी चालू शकत होते. हळुहळू मी सरावाला सुरुवात केली, परंतु माझं शरीर साथ देत नव्हतं. तरीही मी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर कमबॅक केले. अडथळ्यांवर मात करत, वेदनाशामक गोळ्या घेऊन मी हे यश मिळवले. जागतिक स्पर्धेत एका मूत्रपिंडाद्वारे भाग घेणारी कदाचित मी पहिली खेळाडू असेन. माझी गुणवत्ता किंवा प्रशिक्षकांची जादू असे या यशाचे वर्णन करता येईल,''असेही अंजू म्हणाली.
केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले की, ''अंजूने आपली जिद्द, प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर देशाचे नाव उंचावले.''