ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. २२ : २०१२ मध्ये वन डे संघातून सचिन तेंडुलकरने स्वत:हून निवृत्ती घेतली अन इज्जत शाबूत ठेवली. अन्यथा त्याची हकालपट्टी अटळ होती. टीम इंडियाचे माजी निवडकर्ते संदीप पाटील यांनी गुरुवारी हा गौप्यस्फोट केला.सचिन २०१२ मध्ये वन डेतून आणि २०१३ मध्ये २०० वी कसोटी खेळल्यानंतर कसोटी क्रिकेटमधून देखील निवृत्त झाला. कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यात सचिनची संघातील अवस्था जागा अडविणारा खेळाडू अशी झाली होती. त्याने २०१२ मध्ये निवृत्ती घेतली नसती तर हकालपट्टी करण्यासाठी निवडकर्ते तयार होते, असे पाटील यांनी एका मराठी वाहिनीशी बोलताना सांगितले.
राष्ट्रीय निवड समिती प्रमुख म्हणून कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर पाटील पुढे म्हणाले,ह्य१२ डिसेंबर २०१२ ला नागपुरात इंग्लंडविरुद्ध कसोटी खेळली जात असताना तत्कालीन निवडकर्त्यांनी त्याची भेट घेतली. सचिनला त्याच्या भविष्यातील योजनांबद्दल विचारले तेव्हा मी निवृत्ती वैगरे घेणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले. पण निवड समितीने सचिनला बाहेर करण्याचा निर्णय घेत बोर्डाला तसे सूचित केले होते. भविष्यात काय वाढून ठेवले आहे, हे सचिनला कळले असावे. आमची पुढची बैठक झाली तेव्हा वन डेतून निवृत्त होणार असल्याचे सचिनने आम्हाला कळविले. त्याने हा निर्णय घेतला नसता तर त्याची हकालपट्टी अटळ होती.
कसोटीवर लक्ष केंद्रित करण्याचा सचिनचा विचार असावा. त्याने मला आणि संजय जगदळे यांना फोन केला. ४६३ वन डे (४६ शतकांसह १८४२६ धावा) खेळल्यानंतर २३ डिसेंबर २०१२ ला निवृत्ती जाहीर केली. वर्षभरानंतर कसोटीतून निवृत्ती घेण्यासाठी सचिनला बाध्य करण्यात आले. हा खुलासा देखील संदीप पाटील यांनी केला. सचिनच्या निवृत्तीसाठी दोन सामन्यांची कसोटी मालिका बोर्डाच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली. २०० कसोटीत ५१ शतकांसह १५९२१ धावा काढणारा हा खेळाडू १६ नोव्हेंबर २०१३ रोजी निवृत्त झाला. आपल्या कार्यकाळात काही गोष्टी मनाविरुद्ध घडल्याची खंत देखील पाटील यांनी व्यक्त केली