पुण्यात नुकतीच महाराष्ट्र केसरी ( Maharashtra Kesari) स्पर्धा पार पडली अन् परंपरेनुसार त्यातही वाद झाला... सिकंदर शेखला ( Sikandar Shaikh) जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात होते, पण उपांत्य फेरीत तो पराभूत झाला अन् वादाला तोंड फुटले... पंचांचा निर्णय अंतिम असतो हे आपण ऐकतो, पण त्यांच्याकडूनही चुका होतात आणि म्हणून विकसित तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्यावरही आता विश्वास ठेवायचा की नाही, असा प्रश्न महाराष्ट्र केसरीतील प्रकारामुळे उपस्थित होतोय... असो हा वादाचा मुद्दा सोडला तर महाराष्ट्राचे मल्ल हे केवळ 'महाराष्ट्र केसरी' अन् 'हिंद केसरी' या दोन स्पर्धांपुरतेच मर्यादित राहिलेले दिसत आहेत... भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव हे महाराष्ट्राचे सुपूत्र होते हे आपण अभिमानाने सांगतो... पण, त्यांचा हा वारसा पुढे चालवणारा एकही मल्ल आज आपल्या मातीत जन्म घेऊ शकला नाही, ही शोकांतिका आहे.
महाराष्ट्र केसरी जिंकणाऱ्या मल्लावर बक्षीसांचा वर्षाव केला जातो. त्याला सरकारी नोकरीची घोषणा केली जाते अन् तिथेच आपले मल्ल बळी पडतात. एकदा का सरकारी नोकरीचा शिक्का लागला, तर कशाला हवंय ऑलिम्पिक पदक अन् काय? बऱ्याच वर्षांपूर्वी नरसिंग यादवने ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न दाखवले होते आणि तो ते अस्तित्वात आणेल असा ठाम विश्वासही होता. पण, पठ्ठ्या डोपिंगच्या जाळ्यात अडकला अन् पुन्हा येरे माझ्या मागल्या. राहुल अवारे हा मराठमोळा मल्लही काही वर्षांपूर्वी ऑलिम्पिकच्या शर्यतीत आहे असे वाटले होते. पण, पठ्ठ्याने ऑलिम्पिकच्या तोंडावर वजनी गट बदलले.. ( Exclusive : महाराष्ट्राच्या राहुल आवारेचं ऑलिम्पिक स्वप्न अधांतरी?; एक चूक पडू शकते भारी!) आता ते का बदलले, नेमकं काय झालं ? याचे उत्तर तोच देऊ शकतो.. 'लोकमत' ने तेव्हा त्याच्याशी याबाबत चर्चा केली होती, तेव्हा तो वजन घटवून ऑलिम्पिक गटात पुनरागमन करेल, असा विश्वास व्यक्त केला होता... अजून त्याची वाट पाहतोय...
हरयाणाचे वर्चस्व..बजरंग पुनिया,सुशील कुमार, फोगट भगिनी, साक्षी मलिक, योगेश्वर दत्त, रवी कुमार दहिया हे सर्व हरयाणा किंवा त्या नजिकच्या प्रांतातील खेळाडू आज ऑलिम्पिकमध्ये देशाचे नाव रोशन करून झालेत आणि यातील काही अजूनही ऑलिम्पिक स्पर्धा गाजवण्याची तयारी करत आहेत. मग यात महाराष्ट्र कुठेय? महाराष्ट्र केसरी मानाची स्पर्धा आहे त्यात वाद नाहीच, पण आपल्या मल्लांनी त्यापेक्षा मोठं स्वप्न पाहायला हवं, तरच येणाऱ्या पिढीसमोर आदर्श ठेवता येईल. काहींच्या मते हरयाणा, उत्तर प्रदेश यांची लॉबी स्ट्राँग असल्याने तेथील मल्लांची वर्णी लागते, पण, आपणही कुठे कमी पडतोय याचा विचार व्हायला हवा.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"