ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटूसुशील कुमार ( Sushil Kumar) याच्या अडचणीत वाढ झाली असून दिल्ली कोर्टानं त्याच्या न्यायालयीन कोठडीत 9 जुलैपर्यंत वाढ केली आहे. दोन ऑलिम्पिक पदकं नावावर असलेल्या सुशीलवर कुस्तीपटू सागर धनकर याची हत्या केल्याचा आरोप आहे. मे महिन्यात छत्रसाल स्टेडियमवर घडलेल्या या घटनेनंतर सुशील कुमार फरार होता, दिल्ली पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. इतकेच नव्हे तर त्याची माहिती देणाऱ्यास दिल्ली पोलिसांनी 1 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. 23 मे रोजी सुशीलला पकडण्यात यश आले. शुक्रवारी सुशील कुमारची रवानगी मंडोली जेलमधून तिहार जेलमध्ये करण्यात आली. त्यावेळी सुशीलसोबत पोलिसांनी सेल्फी काढला अन् फोटोसेशनही केलं. पोलिसांच्या अशा वागण्यानं नेटिझन्स चांगलेच संतापले आहेत आणि या प्रकरणाचा निकाल काय लागेल, हे त्यांनी आत्ताच ठरवायला सुरूवात केली आहे.
दरम्यान, ४ आणी ५ मेच्या रात्री दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये सुशील कुमार आपल्या काही सहकाऱ्यांसोबत पोहोचला. तिथे त्याने मारहाण केली. या मारहाणीमध्ये पैलवान सागर धनखड गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, मारहाणीच्या घटनेनंतर पुढच्याच दिवशी सुशील कुमार फरार झाला होता. दरम्यान, १७ दिवसांनंतर २३ मे रोजी सुशील कुमार याला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली. दरम्यान, या हत्याकांडाशी संबंधित अनेक आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे.