भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. नवीन तारखेनुसार, २१ डिसेंबर रोजी ही निवडणूक पार पडणार आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांनी सोमवारी क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेतली. क्रीडा मंत्रालयाने अलीकडेच भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अध्यक्षतेखालील महासंघाला बरखास्त केले होते. बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक हे लैंगिक छळाचे आरोप करणाऱ्या सिंग यांच्याविरोधात निदर्शने करणारे प्रमुख चेहरे आहेत.
अनुराग ठाकूर यांच्या भेटीनंतर साक्षी मलिकने म्हटले, "भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीची तारीख जाहीर केल्यामुळे आम्ही या संदर्भात त्यांची भेट घेतली. सरकारचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आम्ही आमचा विरोध थांबवला, मात्र आता सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण करण्याची वेळ आली आहे. ब्रिजभूषण सिंग यांच्याशी संबंधित असलेल्या कोणत्याही व्यक्तीला महासंघात स्थान मिळू नये, अशी आमची मागणी आहे. यावर अनुराग ठाकूर म्हणाले की, सरकार आपली आश्वासने पाळेल आणि आम्हालाही अशीच अपेक्षा आहे."
"आम्हाला आशा आहे की सरकार आपले आश्वासन पाळेल. सरकारच्या म्हणण्यानुसार आम्ही सर्व काही केले आहे. आता आम्हाला सरकारकडून पूर्ण आशा आहे की ते आम्हाला न्याय देतील", असे बजरंग पुनियाने म्हटले. तसेच आश्वासनाची पूर्तता न झाल्यास पुन्हा आंदोलन सुरू करणार का? असे विचारले असता त्याने म्हटले, "आम्ही त्याबद्दल विचार करू... सध्या आमचा सरकारवर विश्वास आहे."
दरम्यान, भारतीय पैलवानांनी भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार ब्रिजभूषण सिंग यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. यानंतर पैलवानांनी दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन केले. जवळपास दीड महिने चाललेल्या या आंदोलनाचा शेवट अनुराग ठाकूर यांच्यासोबतच्या बैठकीनंतर झाला होता. साक्षी मलिक, विनेश फोगाट, बजरंग पुनिया या आंदोलनाचे प्रमुख चेहरे होते.