आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने ( IOC) भारतीय कुस्तीपटूंना पोलिसांकडून दिलेली वागणूक 'अत्यंत त्रासदायक' असल्याचे म्हटले आहे आणि WFI (भारतीय कुस्ती महासंघ) चे माजी प्रमुख ब्रीजभूषण सिंग यांच्याविरुद्ध जलद तपास करण्याची मागणी केली आहे. आयओसीच्या प्रवक्त्याने सांगितले की, “आयओसी आग्रही आहे की कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांचा स्थानिक कायद्यानुसार निष्पक्ष तपास केला जावा. आम्ही समजतो की अशा गुन्हेगारी तपासाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले गेले आहे, परंतु ठोस कृती दृश्यमान होण्यापूर्वी आणखी पावले टाकावी लागतील. आम्ही विनंती करतो की या खेळाडूंची सुरक्षा आणि कल्याण या प्रक्रियेदरम्यान योग्यरित्या विचारात घेतले जावे. हा तपास वेगाने पूर्ण केला जावा ”
२०१६ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेती साक्षी मलिक, राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती विनेश फोगट आणि टोक्यो २०२० कांस्यपदक विजेता बजरंग पुनिया यांसारखे भारतातील काही नामवंत कुस्तीपटू लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या सिंग यांच्या विरोधात एका महिन्यापासून जंतरमंतरवर निदर्शने करत आहेत. सिंग यांच्यावर सात महिला कुस्तीपटूंचा छळ करण्याचा ( त्यापैकी एक अल्पवयीन आहे) आरोप आहे.
सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे ६६ वर्षीय खासदार सिंह यांनी आरोप फेटाळून लावले आहेत आणि हे आंदोलन "राजकीयदृष्ट्या प्रेरित" असल्याचे म्हटले आहे. २८ मे रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करताना, पोलिसांनी इमारतीकडे कूच करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पुनिया आणि मलिक यांच्यासह अनेक कुस्तीपटूंना ताब्यात घेतले. काही आंदोलकांची पोलिसांशी झटापट झाली आणि त्यांना बसमध्ये नेण्यात आले. तिरंगा हातात घेऊन निषेध चालू ठेवण्यासाठी धडपडत असलेल्या कुस्तीपटूंच्या दृश्यांमुळे अनेक भारतीय खेळाडूंनी या प्रकरणात त्वरित कारवाई करण्याचे आवाहन केले.
... तर भारतीय कुस्तीपटूंना 'तिरंग्या'खाली आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळता नाही येणार!
“हा व्हिडिओ मला दुःखी करतो. याला सामोरे जाण्यासाठी आणखी एक चांगला मार्ग असायला हवा,” असे ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा याने साक्षीच्या ट्विटला उत्तर दिले. भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याने ट्विट केले की, “आमच्या कुस्तीपटूंना कोणताही विचार न करता खेचले जाण्याची गरज का आहे? कोणाशीही वागण्याचा हा मार्ग नाही. मला खरोखर आशा आहे की या संपूर्ण परिस्थितीचे योग्य पद्धतीने मूल्यांकन केले जावे.''