Brij Bhushan Singh Statement on Wrestlers Protest । नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले असून कुस्तीपटूंनी केलेला विरोध हे राजकारण असल्याचे म्हटले आहे. सिंह म्हणाले की, कुस्तीपटू काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या हातातील खेळणी बनले आहेत. राजीनामा हे त्यांचे उद्दिष्ट नाही, त्यांचे उद्दिष्ट राजकारण आहे. तसेच मी राजीनामा द्यायला तयार आहे, जर यामुळे हा विरोध संपुष्टात येणार असेल तर ते करेन, असेही सिंह यांनी म्हटले.
दरम्यान, एफआयआरची कॉपी मिळाली नाही, ज्याचा बजरंग पुनियाने दावा केला आहे, असे सिंह यांनी स्पष्ट केले. दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सर्व आरोप फेटाळले. माझ्या राजीनाम्यानंतर पैलवान घरी जाऊन निवांत झोपले तर मला काहीच हरकत नाही, असे ते म्हणाले.
ब्रिजभूषण यांनी आरोप फेटाळलेखरं तर उत्तर प्रदेशमधील कैसरगंज येथील भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात राजधानी दिल्लीत कुस्तीपटू निदर्शने करत आहेत. मागील आठवड्याभरापासून आंदोलक पैलवान आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. ब्रिजभूषण यांनी राजीनामा द्यावा आणि त्यांना अटक करावी, असे आंदोलकांनी ब्रिजभूषण यांच्यावर एफआयआर दाखल झाल्यानंतर म्हटले आहे. जंतरमंतर येथे कुस्तीपटूंचे आंदोलन आज आठव्या दिवशीही सुरू आहे. दिल्ली पोलिसांनी खासदारांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. त्याचबरोबर ब्रिजभूषण शरण सिंह यांनी आरोप चुकीचे असल्याचे सांगितले आहे. त्यांनी याला राजकीय षडयंत्र म्हटले आहे.
आंदोलनाचा आज आठवा दिवस लक्षणीय बाब म्हणजे ऑलिम्पिकमधील कांस्य पदक विजेती साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांसह देशातील ७ नामांकित पैलवानांनी मागील रविवारी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आज आंदोलनाला आठवडा पूर्ण झाला असून भारतीय कुस्ती महासंघाविरोधात दिग्गज खेळाडू जंतरमंतरवर धरणे आंदोलन करत आहेत. प्रशिक्षक महिलांचा छळ करत आहेत आणि फेडरेशनचे काही जवळचे लोक प्रशिक्षक महिला प्रशिक्षकांशीही गैरवर्तन करतात. ते मुलींचा लैंगिक छळ करतात. भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) अध्यक्षांनी अनेक मुलींचा लैंगिक छळ केला आहे, असे गंभीर आरोप महिला पैलवानांनी केले आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"