मुंबईः भारताच्या बजरंग पुनियाने आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या बजरंगने 65 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात कझाकस्तानच्या सायात्बेक ओकासोव्हचा 12-7 असा पराभव केला. विशेष म्हणजे पहिल्या फेरीत बजरंग 2-5 असा पिछाडीवर होता. त्याने जोरदार कमबॅक करताना सुवर्णपदकावर पकड घेतली. बजरंगने 2017मध्ये याच स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते, तर 2018 मध्ये त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते.
अंतिम फेरीच्या सामन्यात पहिल्या मिनिटाला बजरंग 0-4 असा पिछाडीवर गेला. ओकासोव्हने पहिल्या फेरीत 5-2 अशी आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत बजरंगला आणखी धक्का बसला आणि तो 2-7 असा पिछाडीवर फेकला गेला. एका मिनिटाचा कालावधी असताना बजरंगने ओकासोव्हची धोबीपछाड करताना पिछाडी 4-7 अशी कमी केली. अखेरच्या डावात बजरंगने 12-7 अशी आघाडी घेत विजय मिळवला.