नवी दिल्ली : नुकत्याच पार पडलेल्या आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या बजरंग पुनिया आणि कांस्यपदक विजेत्या विनेश फोगाट यांची भारतीय कुस्ती महासंघाने खेल रत्न पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. गतवर्षीही बजरंगची या पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली होती, परंतु भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला हा पुरस्कार देण्यात आला. याशिवाय अर्जुन पुरस्कारासाठी महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवारेच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.
गोल्ड कोस्ट येथे गतवर्षी झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत 50 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवणाऱ्या विनेशचीही गतवर्षी या पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली होती. विनेशने 2014मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत 48 किलो गटात सुवर्णपदक जिंकले होते. आशियाई स्पर्धेत तिने 2014 मध्ये कांस्य, तर 2018 मध्ये सुवर्णपदक जिंकले. त्याशिवाय आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत तिच्या नावावर तीन कांस्य व तीन रौप्यपदकं आहेत.
2018च्या राष्ट्रकुल स्पर्धेत 57 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकणाऱ्या राहुल आवारेची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. त्याने आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत दोन कांस्यपदक जिंकले आहेत, तर राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेत त्याच्या नावावर सुवर्णपदक आहे.