लास वेगास : जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत दुखापतीमुळे ऐनवेळी माघार घेतलेल्या अव्वल मल्ल योगेश्वर दत्त याच्या अनुपस्थितीने काहीसा दुबळा झालेल्या भारतीय संघाची निराशाजनक कामगिरी कायम राहिली. महिलांच्या गटात चार भारतीयांचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले आहे.शुक्रवारी योगेश्वर पुरुषांमध्ये ६५ किलो वजनीगटातून लढणार होता. मात्र गुडघा दुखावल्याने त्याने स्पर्धेतून माघार घेतली. त्यामुळे आता या वजनी गटात भारतीय आव्हान नसणार. त्याचबरोबर महिला गटात अव्वल भारतीय मल्ल गीता फोगटसह चार जणींचे आव्हान संपुष्टात आल्याने भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.महिलांच्या ५८ किलो वजनी गटात पुर्णपणे एकतर्फी झालेल्या सामन्यात जपानच्या काओरी इचोने गिताला १०-० असे सहजपणे लोळवले. त्याचवेळी इचोने अंतिम फेरी गाठल्यानंतर गीताला स्पर्धेत रेपचेजमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली होती. मात्र यामध्येही ती पराभूत झाल्याने कांस्य पदकाची आशा देखील मावळली. यावेळी पुन्हा एकदा एकतर्फी झालेल्या लढतीत गीताला तुर्कीच्या एलिफ जेल येसिलिरमाक विरुध्द ०-१० अशा नामुष्कीस सामोरे जावे लागले. यानंतर एलिफने कांस्य पदक जिंकण्यात यश मिळवले. दरम्यान, भारताच्या अनीताने पात्रता फेरीमध्ये विजयाची नोंद केल्यानंतर तीला उप-उपांत्यपुर्व फेरीमध्ये पराभवाचा सामना कराव लागला. भारताच्या ललिता आणि निक्की यांना देखील अनुक्रमे ५५ आणि ७५ किलो वजनीगटात पराभव पत्करावा लागल्याने उप- उपांत्यपुर्व फेरीमध्येच आपला गाशा गुंडाळावा लागला. ललिताला जपानच्या अनरी किमुराने ७-० असे पराभूत केले. तर निक्कीलासुध्दा जपानच्याच चियाकी लिजिमाविरुध्द ०-७ अशी हार पत्करावी लागली.
भारताची कुस्तीत निराशा
By admin | Published: September 12, 2015 3:14 AM