बिश्केक : भारताचे १७ पैलवान शुक्रवारी येथे सुरू होणाऱ्या आशिया ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत पॅरिस ऑलिम्पिकचा कोटा मिळवण्यासाठी आव्हान सादर करणार आहेत. या स्पर्धेत सर्वांचे लक्ष दोनवेळा ऑलिम्पिक स्पर्धा खेळलेल्या विनेश फोगटवर असेल. या स्पर्धेत फ्रीस्टाइल, महिला आणि ग्रीक-रोमनमध्ये एकूण ३६ कोटा जागा आहेत. भारतीय पैलवान केवळ एक स्पर्धा सोडून सर्व गटांत कोटा मिळवण्याचा प्रयत्न करतील. १९ वर्षीय अंतिम पंघालने सर्बियाच्या बेलग्रेड येथे २०२३ जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकून भारतासाठी महिलांच्या ५३ किलो वजनी गटातील कोटा निश्चित केला आहे.
महिला गटात आता विनेश (५० किलो, रितीका हुड्डा (७६ किलो), २३ वर्षांखालील गटातील जगज्जेती अंशू (५७ किलो), मानसी (६२ किलो) आणि निशा (६८ किलो) यांच्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याची वेळ आली आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध भारतीय पैलवानांच्या विरोधाचा प्रमुख चेहरा म्हणून विनेशच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असेल. पुरुषांच्या फ्रीस्टाईल गटात अमन सहरावत (५७ किलो) याने राष्ट्रीय चाचणीत टोकियो ऑलिम्पिक पदक विजेता रवी दहिया याला पराभूत केले होते. त्यामुळे त्याच्या कामगिरीवर लक्ष असेल. सुजीत याच्यावरही लक्ष असेल. टोकियो ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेता बजरंग पूनिया याच्या अपयशानंतर ६५ किलो गटात तो आव्हान देणार आहे.