नवी दिल्ली - भारतीय आॅलिम्पिक महासंघावर (आयओए) रविवारी आयोजित एका कार्यक्रमात लाजिरवाणे होण्याची वेळ आली. कारण रोख पुरस्कार रकमेसाठी आशियाई स्पर्धेतील पदकविजेत्यांसाठी तयार करण्यात आलेल्या चेकवर नाव चुकीचे लिहिण्यात आले. एवढेच नाही तर एका खेळाडूच्या नावाचा समावेशही नव्हता.त्यात जवळजवळ १५ खेळाडूंचा समावेश होता. त्यात कम्पाऊंड तिरंदाज ज्योती सुरेखा वेनाम आणि अभिषेक वर्मा यांना केवळ पुष्पगुच्छ देण्यात आले. कारण त्यांचे नाव चेकवर चुकीचे लिहिण्यात आले होते. आयओएने सांघिक स्पर्धेतील सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदक विजेत्यांना अनुक्रमे तीन लाख, दोन लाख आणि एक लाख रुपयांचे पुरस्कार दिले. वैयक्तिक पदक विजेत्यांना पाच लाख, तीन लाख आणि दोन लाख रुपयांचे पुरस्कार देण्यात आले.आयओएचे अध्यक्ष नरिंदर बत्रा म्हणाले,‘मी झालेल्या चुकीसाठी माफी मागतो. जवळजवळ १४-१५ खेळाडूंचे नाव चुकीचे छापल्या गेले आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना केवळ पुष्पगुच्छ देत आहोत. चिंता करू नका, तुम्हाला रोख पुरस्कार मिळतील. चुकीचे नाव असलेले चेक त्यांना देणार नाही.’ आणखी एक लाजिरवाणी बाब म्हणजे आयोजक कांस्यपदपक विजेती मल्ल दिव्या काकरानच्या नावाचा उल्लेख करण्याचे विसरले.ज्यावेळी काकरानच्या आई-वडिलांनी कार्यक्रमानंतर बत्रा यांना याबाबत विचारणा केली तेव्हा अध्यक्षांनी क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांना दिव्याच्या पुरस्कराची घोषणा करण्यासाठी आमंत्रित केले, पण ते कार्यक्रम स्थळावरून रवाना झाले होते. काकरानची आई म्हणाली,‘ते सांगत आहेत की तिचे नाव यादीत नाही, पण आम्ही तिचे नाव दिले होते. काय होत आहे, याची मला कल्पना नाही.’आयओएचे महासचिव राजीव मेहता म्हणाले,‘कुठलीही बाब प्रथमच घडते. खेळाडूंनी चांगली कामगिरी केल्यामुळे आम्ही त्यांना रोख पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला. आम्ही भविष्यातही आॅलिम्पिक, राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेतील पदक विजेत्यांना रोख पुरस्कार देण्याची परंपरा कायम राखू. ही रक्कम आम्हाला आमचे प्रायोजक देतील.’अनेक खेळाडूंनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्यात सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोपडा, टेनिसपटू रोहन बोपन्ना व दिवीज शरण, मल्ल बजरंग पूनिया व विनेश फोगाट यांच्याव्यतिरिक्त बॅडमिंटनपटू पदकविजेत्या पी.व्ही. सिंधू व सायना नेहवाल यांचा समावेश आहे.भारताने आशियाई स्पर्धेतील आपली सर्वोत्तम कामगिरी करताना ६९ पदके पटकावली. (वृत्तसंस्था)
चेकवर खेळाडूंची चुकीची नावे, नरिंदर बत्रा यांनी मागितली माफी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 2:25 AM