WWE सुपरस्टार जॉन सिना (John Cena) यानं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा (Mahendra Singh Dhoni) फोटो शेअर केला आहे. सिनानं याआधी देखील प्रसिद्ध भारतीय व्यक्तीमत्त्वाचं फोटो शेअर केले आहेत आणि त्या यादीत आता महेंद्रसिंग धोनीचाही समावेश झाला आहे. तब्बल १६ वेळा WWE चॅम्पियनशीप नावावर असलेल्या जॉन सिनाची सोशल मीडियात तुफान लोकप्रियता आहे. त्याच्या फॉलोअर्सची संख्या देखील प्रचंड आहे. पण त्याच्याकडून इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात येणाऱ्या फोटोंमुळे अनेकदा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळतं. याआधी जॉन सिनानं त्याच्या इन्स्टाग्रामवर विराट कोहली, शाहरुख खान आणि तर सेलिब्रेटिंचे फोटो पोस्ट केले होते.
जॉन सिनानं शनिवारी त्याच्या इन्स्टा प्रोफाइलवर धोनीचा यंदाच्या ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमधील एक फोटो शेअर केला आहे. यात धोनी भारतीय संघाचा मेन्टॉर म्हणून काम पाहात होता. पण भारतीय संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीत दाखल होऊ शकला नाही. सुपर-१२ मध्येच भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आलं. सामना संपल्यानंतर सर्व खेळाडूंचा सन्मान राखत हातमिळवण्याची एक परंपरा आहे. अशाच एका सामन्यात सामना संपल्यानंतर धोनी हातमिळवण्यासाठी पुढे सरसावत असल्याचा फोटो सिनानं पोस्ट केला आहे.
भारतीय संघाची यंदाची ट्वेन्टी-२० वर्ल्डकप मोहीम निराशाजनक राहिली. भारतीय संघाला पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागलं. अफगाणिस्तान आणि स्कॉटलंड विरुद्ध दमदार पुनरागमन करत भारतीय संघानं विजय प्राप्त केला खरा पण तोवर खूप उशीर झाला होता. पाकिस्ताननं साखळी फेरीतील सर्व सामन्यांमध्ये विजय प्राप्त करत उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. तर न्यूझीलंडनं पाच पैकी चार सामन्यांमध्ये विजय प्राप्त करत उपांत्य फेरी गाठली.