- सुशील कुमार लिहितो...रि ओमध्ये तिरंगा फडकण्याची देशाला प्रतीक्षा होती. १२ दिवस प्रतीक्षा करावी लागल्याने नकारात्मकवृत्ती वाढत चालली होती. पण मला आशा होती. आमचे मल्ल रिंगणात उतरतील तेव्हा पदकाचा दुष्काळ संपेल असे मनोमन वाटत होते.साक्षी मलिकने शानदार पद्धतीने रिओत खाते उघडले. सुरुवातीला साक्षीला संघर्ष करावा लागला पण तिने संधीचे सोने करीत ऐतिहासिक पदक जिंकले. हरियाणातील एका मुलीने आॅलिम्पिकसारख्या महाकुंभात देशाचे पदकाचे खाते उघडले हे पाहणे सुखद होते. साक्षीने मल्लांच्या मोहिमेचा प्रारंभ केला. आता योगेश्वरची वेळ आहे.साक्षीच्या रूपाने कुस्ती भारताला गर्वाचे क्षण मिळवून देऊ शकते हे पहायला मिळाले. या खेळावर आम्ही सर्वजण जीवापाड प्रेम करतो. या खेळाने आॅलिम्पिक पदकांच्या बाबतीत शुटिंगला मागे टाकले आहे. भारताच्या झोळीत आता शुटिंगच्या चारच्या तुलनेत कुस्तीची पाच पदके आहेत. ही एक अशी उपलब्धी आहे की ज्यावर आम्हा सर्व भारतीयांना अभिमान वाटावा.रिओ आॅलिम्पिकची सांगता करताना माझा मित्र योगेश्वर दत्त रिंगणात उतरणार आहे. मी त्याला खेळताना पाहू इच्छितो. योगेश्वरकडे जो अनुभव आहे, तो पाहता त्याने आपला सर्वोत्कृष्ट डाव अखेरच्या दिवसासाठी राखून ठेवला असावा, असे दिसते. योगेश्वर करिअरमधील सर्वोत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. स्वत:च्या चौथ्या आॅलिम्पिकमध्ये निश्चितपणे पदकाचा रंग बदलू शकेल. त्याने स्वत:च्या लढतीकडे पूर्णपणे लक्ष द्यावे. सर्वोत्कृष्ट कामगिरीद्वारे त्याने पदक खेचून आणावे इतका माझा त्याला सल्ला असेल. साक्षीच्या कांस्याशिवाय पी. व्ही. सिंधूने देखील रौप्य पदक जिंकले. भारतीय महिला खेळाडू आॅलिम्पिकमध्ये रौप्य जिंकू शकली नव्हती. सिंधूने ही पोकळी भरून काढली. यामुळे ती दिग्गज आॅलिम्पिकपटूंच्या पंक्तीत दाखल झाली आहे.भारतीय बॅडमिंटनला नवी उभारी आणि लोकप्रियता मिळवून देण्यासाठी मी पुलेला गोपीचंद आणि सायना नेहवाल यांना देखील धन्यवाद देऊ इच्छितो. (टीसीएम)
योगेश्वर पदकाचा रंग बदलेल !
By admin | Published: August 21, 2016 5:11 AM