नवी दिल्ली : देशाचा दिग्गज मल्लांमध्ये गणल्या जाणारा आणि रियोत भारताच्या पदकाचे आशास्थान असणाऱ्या योगेश्वर दत्तने कजाकिस्तानच्या अस्ताना येथे सुरू असलेल्या आशियाई आॅलिम्पिक क्वॉलीफाइंग स्पर्धेच्या फ्री स्टाईलच्या ६५ किलो वजन गटाच्या फायनलमध्ये धडक मारली आणि त्याचबरोबर त्याने शनिवारी रिओ आॅलिम्पिकचा कोटाही मिळवला.योगेश्वर आता सुवर्णपदकासाठी चीनच्या कताई यिरानबिएक याच्याशी दोन हात करेल. कताईने उपांत्य फेरीत अॅडम बातिरोव याचा ६-१ असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली.२0१२ च्या लंडन आॅलिम्पिकच्या कास्यपदक विजेत्या योगेश्वरने क्वालिफिकेशन राऊंडमध्ये जू सोंग किम याचा ८-१ असा पराभव केला आणि उपांत्यपूर्व फेरीत व्हिएतनामच्या युआन दिन्ह एनगुएन याचा १२-२ असा धुव्वा उडवला. लयीत दिसणाऱ्या योगेश्वरने कोरियाच्या सियुंगचुल ली याचे ७-२ असे आव्हान मोडीत काढताना दिमाखात अंतिम फेरीत धडक मारली. रिओ आॅलिम्पिकचे तिकीट पक्के करणारा योगेश्वर हा भारताचा दुसरा मल्ल ठरला. याआधी नरसिंह यादव याने आॅलिम्पिक कोटा मिळवला होता. रिओ आॅलिम्पिकसाठी योगेश्वर दत्त (६५ किलो) याच्या आधी नरसिंह यादवने ७४ किलो फ्री स्टाईल प्रकारात कोटा प्राप्त केला होता. २0१२ च्या लंडन आॅलिम्पिकसाठी भारताचे चार पुरुष आणि एक महिला पहिलवान पात्र ठरले होते. स्पर्धेत अन्य भारतीय पहिलवानात महिलांच्या ५८ किलो फ्री स्टाईल प्रकारात साक्षी मलिक आणि पुरुषांच्या फ्री स्टाईलच्या ९७ किलो वजन गटात सत्यव्रत कादियान यांच्या उपांत्य फेरीतील पराभवामुळे ते आॅलिम्पिक कोटा मिळवण्यापासून वंचित ठरले. (वृत्तसंस्था)
योगेश्वरने आॅलिम्पिक कोटा मिळवला
By admin | Published: March 20, 2016 4:06 AM