ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. २४ - बुधवारी चिन्नास्वामी स्टेडियमवर शेवटच्या क्षणापर्यंत रोमहर्षक झालेल्या सामन्यात झुंझार वृत्तीचे प्रदर्शन करीत भारताने बांगलादेशवर एका धावेने विजय मिळवला. मात्र या विजयानंतर भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी भडकल्याचे दिसले आणि त्याला कारणीभूत ठरला एक पत्रकार. एरवी कॅप्टन कूल अशी ओळख असलेला धोनी सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत रागावलेला दिसला.
' या सामन्यात भारताल मोठ्या फरकाने विजय मिळवणं गरजेचं होतं, मात्र तुम्ही हा सामना हरता-हरता जिंकलात, तुम्हाला कसाबसा विजय मिळाला... याबद्दल तुम्हाला काय वाटतं?' असा सवाल एका पत्रकाराने धोनीला विचारल्यानंतर तो भडकला आणि त्याने पत्रकाराला चांगलच फटकारलं.
' मला माहीत आहे की भारताच्या विजयामुळे तुम्हाला आनंद झालेला नाही. तुम्ही विचारलेला हा प्रश्न आणि तुमचा टोन यावरून असं लक्षात येतयं की भारताच्या विजयामुळे तुम्हाला आनंद नव्हे दु:ख झालं आहे. क्रिकेटच्या सामन्यात कोणतीही स्क्रीप्ट नसते, टॉस हरल्यानंतर ज्या पीचवर फलंदाजी केली तिथे जास्त धावा का झाल्या नाहीत, याचं आम्हाला तिथे विश्लेषण करावं लागतं' अशा शब्दांत धोनीने त्या पत्रकाराला सणसणीत उत्तर दिलं. एवढंच नव्हे तर ' बाहेर बसून जर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचे विश्लेषण करता येत नसेल तर तुम्ही असे प्रश्नही विचारत जाऊ नका' असंही धोनीने त्याला सुनावलं.