Sachin Tendulkar wishes Praggnanandhaa : १६ वर्षीय भारतीय बुद्धिबळपटू युवा ग्रँडमास्टर आर प्रग्यानंद याने सोमवारी 'वर्ल्ड चॅम्पियन' मॅग्नस कार्लसनचा पराभव केला. प्रग्नानंदने केवळ ३९ चालींमध्ये कार्लसनला गुडघे टेकायला लावले. Airthings Masters chess या ऑनलाइन जलद बुद्धिबळ स्पर्धेत आठव्या फेरीत त्याने हा पराक्रम करून दाखवला. महत्त्वाची बाब म्हणजे त्याने काळ्या मोहऱ्यांसह हा खेळ जिंकला. या विजयानंतर मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याचं तोंडभरून कौतुक केलं. (कोण आहे प्रग्यानंद.. जाणून घ्या)
प्रग्यानंदला विजय मिळवून मस्त वाटत असेल याची मला खात्री आहे. केवळ १६ वर्षांचे वय आणि त्यात अनुभवी व प्रतिभावान मॅग्नस कार्लसनला पराभूत करणं... आणि त्यातही काळ्या मोहऱ्यांसह खेळताना वर्ल्ड चॅम्पियनला धूळ चारलं हे खरंच जादुई आहे. प्रग्यानंद, तुझ्या उज्ज्वल आणि दीर्घकालीन कारकिर्दीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. तू भारताचा अभिमान आहेस, असं ट्वीट करत सचिन तेंडुलकरने आर प्रग्यानंदचे अभिनंदन केलं. R Praggnanandhaa
या विजयानंतर भारतीय ग्रँडमास्टर प्रग्यानंदचे ८ गुण झाले आणि तो आठव्या फेरीनंतर संयुक्त १२व्या स्थानावर पोहोचला. आधीच्या फेऱ्यांमध्ये अपेक्षेप्रमाणे दमदार कामगिरी करणाऱ्या कार्लसनवर प्रग्यानंदचा विजय अनपेक्षित होता. या आधी प्रग्यानंदने फक्त लेव्ह अरोनियन विरुद्ध विजय नोंदवला होता. तर २०१४ मध्ये प्रग्यानंदला पराभवाचा सामना करावा लागला होता. प्रग्यानंदने दोन सामने अनिर्णित राखले. त्याने अनिश गिरी आणि क्वांग लिम यांच्याविरुद्धचे सामने अनिर्णित राखण्यात यश मिळवलं होतं. तर एरिक हॅन्सन, डिंग लिरेन, जॅन क्रिझिस्टॉफ डुडा आणि शाख्रियार मामेदयारोव्ह यांच्याविरोधात त्याला पराभव पत्करावा लागला होता.