लंडन : चेंडूला चकाकी आणण्यासाठी वेगवान गोलंदाज लाळेचा वापर करतात. कोरोनामुळे हे थांबवावे का, याविषयी चचेला उधाण आले आहे. दुसरीकडे फुटबॉल मैदानावर खेळाडूंना थुंकणे यापुढे महागडे ठरू शकते. फिफाच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष मायकेल डी’हूगे यांनी या संदर्भात सर्वांना सावध करणारे वक्तव्य केले.जोवर कोरोना व्हायरसवर लस येत नाही तोवर फुटबॉल मैदानात अनेक समस्या उद्भवतील असे सांगून त्यांनी थुंकण्याच्या सवयीवर आवर घालावाच लागेल, असे म्हटले आहे. ते म्हणाले, ‘खेळाडू मैदानावर असतील तर एकमेकांच्या संपर्कात आल्याशिवाय कसे राहू शकतील.माझ्या मते, कोरोना लस येण्याची प्रतीक्षा करावीच लागेल. स्वच्छतेसंबंधी नियम तयार करण्याची आता वेळ आली आहे. फुटबॉलपटूंना मैदानावर थुंकण्याची सवय सोडावी लागेल. थुंकणे, खोकणे ही भविष्यात धोक्याची घंटा ठरू शकते.कोरोनाचा प्रकोप वाढत असताना फुटबॉल लीग सुरू करण्यासंदर्भातही त्यांनी धोक्याचा इशारा दिला. सर्वच देशांनी आपल्या राष्ट्रीय स्पर्धा पूर्ण करण्यापेक्षा पुढील सत्र लवकर कसे सुरू करता येईल यावर भर द्यावा. पुढील काही आठवडे फुटबॉलचा खेळ सुरू करणे धोकादायक ठरेल, असा त्यांनी प्रस्ताव दिला.बेल्जियममध्ये वास्तव्य करणारे डींहूगे म्हणाले, ‘फुटबॉल सुरू करण्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. मी एक डॉक्टर या नात्याने ही बाब तुमच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. सामन्याचा आयोजक या नात्याने मला बोलण्याची गरज नाही. तज्ज्ञ या नात्याने सामन्यांना सुरुवात करण्याबाबत मी शंकास्पद आहे.’ (वृत्तसंस्था)> ...तर येलो कार्ड दाखवाफिफा वैद्यकीय समितीच्या अध्यक्षांनी दिलेल्या प्रस्तावानुसार एखादा खेळाडू मैदानावर थुंकत असेल तर त्याला येलो कार्ड दाखविण्यात यावे. सध्याची स्थिती दुसऱ्या महायद्धादरम्यानच्या स्थितीहून खराब आहे. आम्ही कसे जगत आहोत, कोरोनाचा प्रकोप किती भीषण आहे हे विसरून चालणार नाही. आरोग्याशी निगडित समस्यांना प्राधान्य द्यायलाच हवे. पैसा कमविण्यामागे धावण्याची ही वेळ नव्हे तर जीव वाचविण्याची धावपळ करावी लागत आहे.
"मैदानावर थुंकणे सोडून द्यावे लागेल"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 3:46 AM