तैपई : युवा शटलर सिरील वर्मा आणि श्रीकृष्ण प्रिया कुदरावल्ली यांनी आपली विजयी घोडदौड कायम राखताना चीनी तैपई ग्रां. प्री. गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेच्या उप-उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. सिरीलने पुरुष, तर श्रीकृष्ण प्रियाने महिला गटात आपली छाप पाडली. तीन गेमपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात सिरिलने झुंजार खेळाचे प्रदर्शन करताना स्थानिय खेळाडू चिया हाओ ली याचे आव्हान १६-२१, २१-१७, २१-१७ असे संपुष्टात आणले. ५१ मिनिटांपर्यंत रंगलेल्या या चुरशीच्या सामन्यात पहिला गेम गमावल्यानंतर सिरिल पिछाडीवर पडला. यानंतर मात्र त्याने दमदार पुनरागमन करताना ली याला फारशी संधी दिली नाही. पहिल्या गेममधील चुका कटाक्षाने टाळताना सिरिलने स्मॅश व नेटजवळील फटक्यांवर नियंत्रण राखले. दुसरा गेम जिंकून सामना बरोबरीत आणल्यानंतर तिसऱ्या व अंतिम गेममध्ये सिरिलने कामगिरीत सातत्य राखताना बाजी मारली. स्पर्धेत १६वे मानांकन लाभलेल्या सिरिलचा पुढील सामना मलेशियाचा ली जी जिया याच्याविरुद्ध होईल. विशेष म्हणजे जिया यानेच भारताचा गतविजेत्या सौरभ वर्माला नमवून स्पर्धेबाहेर केले होते. दुसरीकडे, महिला एकेरी गटात श्रीकृष्ण प्रियाने चीनी तैपईच्याच चियांग मेई हुईला २१-१७, २०-२२, २१-९ असे नमवले. पहिला गेम जिंकून आश्वासक सुरुवात केलेल्या श्रीकृष्ण प्रियाला दुसऱ्या गेममध्ये हुईकडून कडवी टक्कर मिळाली. दुसरा गेम थोडक्यात गमावल्यानंतर तिसऱ्या गेममध्ये सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करताना श्रीकृष्ण प्रियाने आपली आघाडी एकतर्फी वाढवताना हुईला प्रचंड दबावाखाली आणले. यामुळे दडपणाखाली आलेल्या हुईकडून अनेक चुका झाल्या व त्याचा फायदा घेत श्रीकृष्ण प्रियाने आगेकूच केली. पुढील फेरीत श्रीकृष्ण प्रियाचा सामना तैपईच्याच शुओ युन संगविरुद्ध होईल. (वृत्तसंस्था)
युवा सिरिल वर्माची विजयी आगेकूच
By admin | Published: June 29, 2017 12:49 AM