-सौरव गांगुली -आयपीएल-१० निर्णायक वळणावर आले आहे. ‘प्ले आॅफ’मध्ये सर्वांत आधी स्थान मिळविण्याचे श्रेय मुंबई इंडियन्सला मिळाले आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि रायजिंग पुणे सुपरजायंटस् देखील फार मागे नसल्याचे बोलले जाते; पण या दोन्ही संघांंनी अद्यापही काळजी घेण्याची गरज आहे.केकेआरने मागचे दोन्ही सामने गमविले; पण दीर्घकाळ चालणाऱ्या अशा स्पर्धेत पराभव स्वाभाविक आहेत. रॉबिन उथप्पा आणि ख्रिस लीन यांची अनुपस्थिती संघाला महागडी ठरत आहे. दोघेही पुढील सामन्यात परततील अशी आशा आहे. याशिवाय संघाने सलामीच्या जोडीतील तारतम्यही लक्षात घ्यायला हवे.पुणे संघ योग्यवेळी मुसंडी मारण्यात यशस्वी ठरला. संघ निवडीतही तारतम्य पाळले. गोलंदाजी ढेपाळल्याचे लक्षात येताच स्टीव्ह स्मिथने जयदेव उनाडकटच्या सोबतीला डॅन ख्रिस्टियन आणि शार्दुल ठाकूर यांची निवड केली. पुढे काही अनपेक्षित घडले नाही तर मी वरील तिन्ही संघांना क्वालिफायर्सचा दावेदार मानत आहे. सनरायजर्स हैैदराबाद हा चौथ्या स्थानावर असला तरी किंग्ज पंजाब आणि दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून आव्हान मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्पर्धेत अनेक खेळाडूंनी आपापली छाप सोडली. बेन स्टोक्सची खेळी अप्रतिम ठरली. त्याने पुण्याला एक हाती विजय मिळवून दिला. याशिवाय राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, ऋषभ पंत यांचीही खेळ बहारदार होती. सॅमसन हा फारच कौशल्यपूर्वक खेळतो. राहुल द्रविडच्या मार्गदर्शनात तो मोक्याच्यावेळी ‘क्लिक’ होईल, यात शंका नाही. त्रिपाठी देखील कमालीचा चांगला फलंदाज जाणवला. त्याची केकेआरविरुद्धची ९३ धावांची खेळी सध्याच्या आयपीएलमधील सर्वोत्कृष्ट खेळी होती. प्रत्येक धाव घेण्यासोबत त्याच्यात आत्मविश्वासाचा संचार होत आहे.पण, मला युवा ऋषभने फारच प्रभावित केले. चांगल्या संघाला मोठे सामने जिंकून देण्याची क्षमता असलेल्या युवा खेळाडूंची गरज असते. ऋषभ या नियमात फिट बसतो. दिल्लीने पाठोपाठ जे दोन विजय मिळविले त्यातील गुजरातविरुद्धचा विजय प्रेक्षणीय वाटला. सॅमसनने यात मोठी भूमिका बजावली खरी, पण पंतच्या ९७ धावा सर्वांना प्रभावित करणाऱ्या ठरल्या. ऋषभ खेळत असताना आज त्याचाच दिवस आहे की काय असे चित्र होते. त्याने सामन्याचे चित्र पालटल्याने तो ‘मॅचविनर’ ठरला. (गेमप्लान)
युवा ऋषभ पंतची कामगिरी प्रभावित करणारी
By admin | Published: May 06, 2017 12:38 AM