हरारे : झिम्बाब्वेविरुद्ध पहिल्या टी-२० लढतीत पत्कराव्या लागलेल्या पराभवातून युवा खेळाडू बोध घेतील, अशी आशा भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनीने व्यक्त केली. युवा खेळाडूंनी मोक्याच्या क्षणी आपल्या विकेट गमावल्यामुळे पाहुण्या संघाला शनिवारी २ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. सोमवारी खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या लढतीत युवा खेळाडू या चुकांची पुनरावृत्ती करणार नाहीत, अशी आशा धोनीने व्यक्त केली. धोनी पुढे म्हणाला, ‘फलंदाजांनी जबाबदारी स्वीकारायला हवी. कारण शनिवारच्या लढतीत काही फलंदाजांचा खेळपट्टीवर जम बसला होता. लक्ष्याचा पाठलाग करताना विजयाला गवसणी घालणे महत्त्वाचे ठरते. भारतीय फलंदाजांमध्ये त्याची उणीव जाणवली. हा दौरा युवा खेळाडूंना संधी देण्यासाठी आहे. मला या संघात चौथ्या क्रमांकावर सहज फलंदाजी करता आली असती; पण युवा खेळाडूंना प्रतिभा दाखविण्याची ही चांगली संधी आहे. मी केवळ त्यांना समजून घेण्यासाठी आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येथे आहो.’ (वृत्तसंस्था)पराभव स्वीकारावा लागणे निराशाजनक आहे. सामना गमावला असला तरी युवा खेळाडूंना शिकण्याची संधी असते; पण त्यापासून त्यांनी बोध घ्यायला पाहिजे. भारताचे प्रतिनिधित्व करताना दडपण असते. अशा प्रकारचे दौरे दडपण झुगारण्यासाठी सहायक ठरतात.- महेंद्रसिंह धोनी
युवा खेळाडू चुकांपासून बोध घेतील : धोनी
By admin | Published: June 20, 2016 3:20 AM