रोहित नाईक, मुंबईआपण विजेतेपदाचे दावेदार का आहोत, हे सिद्ध करताना बलाढ्य यू मुम्बाने धमाकेदार विजयासह पटणा पायरेट्सचा ३५-१८ असा फडशा पाडून सलग दुसऱ्यांदा दिमाखात अंतिम फेरी गाठली. याआधी झालेल्या उपांत्य सामन्यात तेलुगू टायटन्सला ३९-३८ असा धक्का देणाऱ्या बंगळुरू बुल्सविरुद्ध मुंबईकर विजेतेपदासाठी भिडतील.वरळीच्या एनएससीआय स्टेडियममध्ये झालेल्या या एकतर्फी सामन्यात सुरुवातीच्या रिकाम्या चढायांनंतर मुंबईकरांनी आपला हिसका दाखवण्यास सुरुवात केली. रिशांक देवडिगाने यू मुम्बाच्या गुणांचे खाते उघडल्यानंतर इतर खेळाडूंनीदेखील दमदार चढायांचा धडाका लावत पायरेट्सला लोळवण्यास सुरुवात केली. ११व्या मिनिटाला मुंबईकरांनी पायरेट्सवर पहिला लोण चढवून ११-२ अशी एकतर्फी आघाडी घेऊन पुढे काय होणार, याची कल्पनाच दिली. तर, या वेळी पायरेट्सच्या चेहऱ्यावरील दडपण स्पष्टपणे दिसून येत होते. मोठ्या पिछाडीच्या दडपणाखाली त्यांचा खेळ खालावला आणि याचा फायदा घेऊन मुंबईकरांनी आणखी एक लोण चढवून मध्यंतराला २२-६ अशी मोठी आघाडी आपला विजय निश्चित केला. दुसऱ्या सत्रात पायरेट्सने थोडा प्रतिकार करताना यू मुम्बाला झुंजवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. मात्र, मजबूत स्थितीत असलेल्या मुंबईकरांनी एकूण २ लोण चढवून अखेरपर्यंत वर्चस्व राखून पायरेट्सला सहज लोळवले. बचावपटूंचे वर्चस्व राहिलेल्या या सामन्यात सुरेंद्र नाडाने एक सुपर टॅकल करताना सर्वाधिक १० गुणांसह मुंबईला विजयी केले. जीवा कुमारनेदेखील त्याला उपयुक्त साथ देताना पायरेट्सच्या आक्रमकांची हवा काढली. तर, कर्णधार अनूपकुमार, शब्बीर बापू आणि रिशांक यांनी नेहमीप्रमाणे खोलवर चढाया करीत पायरेट्सला जेरीस आणले. पायरेट्सकडून दीपक नरवाल आणि अमित हुडा यांनी अयपयशी लढत दिली. तत्पूर्वी, अत्यंत तणावाखाली खेळल्या गेलेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात बंगळुरू बुल्सने संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या तेलुगू टायनटन्सचा ३९-३८ असा पराभव करताना दिमाखात अंतिम फेरी गाठली. अखेरच्या चढाईपर्यंत रंगलेल्या या सामन्यात दडपणाखाली आलेल्या तेलुगू टायटन्सने नियंत्रण गमावले. अखेरच्या १० मिनिटांमध्ये बंगळुरू बुल्सच्या चुकांचा फायदा घेत टायटन्सने २५-३५ अशा पिछाडीवरून ३२-३८ असे पुनरागमन केले. मात्र, शेवटच्या चढाईमध्ये असलेली एका गुणाची आघाडी निर्णायक ठरवताना कर्णधार मनजित चिल्लरने बुल्सला अंतिम फेरीत नेले. मध्यंतराला बंगळुरू बुल्सने १६-१० अशी आघाडी घेऊन सामन्यावर नियंत्रण राखले होते. कर्णधार मनजित, स्टार रेडर अजय ठाकूर, आणि धरमराज चेलारतन बंगळुरू बुल्सच्या विजयाचे शिल्पकार ठरले.
यू मुम्बा सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत
By admin | Published: August 21, 2015 11:49 PM