रोहित नाईक , नवी दिल्लीभक्कम पकडी व तुफानी चढाया असा अष्टपैलू खेळ केलेल्या गतविजेत्या यू मुंबाने बंगाल वॉरीयर्सचा ४१-२९ असा धुव्वा उडवून सलग तिसऱ्या मोसमात प्रो कबड्डीच्या अंतिम सामन्यात धडक मारली. याआधी झालेल्या उपांत्य सामन्यात पुणेरी पलटनला ४०-२१ने लोळवणाऱ्या पटना पायरेट्सविरुध्द मुंबईकर विजेतेपदासाठी भिडतील. इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये दोन्ही उपांत्य सामने एकतर्फीच झाले. पहिल्याच चढाईत कर्णधार अनुप कुमारने यू मुंबाला गुण मिळवून दिल्यानंतर मुंबईकरांचा धडाका अखेरपर्यंत कायम राहिला. बंगालचे चढाईपटू आक्रमणाच्या प्रयत्नात मुंबईकरांच्या पकडीत अडकले. इराणी खेळाडू फझेल अत्राचलीने पुन्हा एकदा शानदार पकडी करुन बंगालला रोखले. अनुभवी जीवा कुमारनेही निर्णायक पकडी केल्या. तर रिशांक देवाडिगाने अष्टपैलू खेळ व अनुपने आक्रमक चढाया करुन अनुक्रमे १३ व ६ गुणांची वसूली केली. मोहित चिल्लरने दमदार बचाव करताना मुंबईच्या विजयात मोलाचे योगदान दिले.मध्यंतराला मुंबईने २६-८अशा आघाडीसह निकाल स्पष्ट केला. मुंबईच्या आक्रमक व ताकदवर खेळापुढे बंगालच्या एकाही खेळाडूचा निभाव लागला नाही. मुंबईकरांनी बंगालवर एकूण ३ लोण चढवून दबदबा राखला. बंगालकडून उमेश म्हात्रेने अष्टपैलू खेळीसह मुंबईला रोखण्याचा प्रयत्न केला. तर आक्रमणात नितीन तोमरने ८ गुण मिळवत लढवय्या खेळ केला. महेंद्र राजपूत व विनीत शर्मानेही चढायांमध्ये संघाची गुणसंख्या वाढवली, मात्र तोपर्यंत उशीर झालेला. तत्पूर्वी झालेल्या अत्यंत एकतर्फी उपांत्य सामन्यात बलाढ्य पटना पायरेट्सने स्पर्धेत चमकदार आगेकूच केलेल्या पुणेरी पलटणचा ४०-२१ असा फडशा पाडून अंतिम फेरी गाठली. सुरुवातीपासूनच केलेल्या दमदार पकडींच्या जोरावर पटनाने पुण्यावर अखेरपर्यंत एकहाती वर्चस्व राखले. ७व्या मिनिटापर्यंत सामना ४-३ असा अटीतटीचा होता. मात्र पटनाने ९व्या मिनिटाला पुण्यावर पाहिला लोण चढवून ११-३ अशी एकतर्फी आघाडी घेतली. यानंतर १३व्या मिनिटाला प्रदीपने केलेल्या अप्रतिम चढाईच्या जोरावर दुसरा लोण चढवून पटनाने २०-४ अशी आघाडी घेतली. प्रदीपने एकाच चढाईत ६ गुण घेत संघाल मोठ्या आघाडीवर नेले. हाच या सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला.मध्यंतराला पटनाने २५-७ असे वर्चस्व राखल्यानंतर पुणेकरांनी पटनावर एक लोण चढवून पुनरागमनाचे प्रयत्न केले. मात्र दबावाखाली पुण्याचा खेळ उंचावला नाही. प्रदीपने निर्णायक चढाया करताना १० गुणांची कमाई केली.> आम्ही आखलेल्या रणनितीनुसार यशस्वी खेळ केला. त्यामुळेच विजयी झालो. गेल्या दोन मोसमातही आम्ही उपांत्य फेरी गाठलेली, मात्र त्यावेळच्या चुका यावेळी आम्ही टाळल्या. प्रदीप नरवालच्या चढाया आमच्यासाठी निर्णायक ठरल्या.- मनप्रीत सिंग, पटना पायरेट्स, कर्णधार> सलग तिसऱ्यादा अंतिम फेरी गाठल्याचा आनंद आहे. आता अंतिम सामन्यावर पुर्ण लक्ष केंद्रीत असून पटना पायरेट्सविरुध्दचा हा सामना नक्कीच अटीतटीचा होईल. या निर्णायक सामन्याचा सर्वच खेळाडूंवर दडपण असेल आणि जो संघ उत्कृष्ट खेळेल तोच विजयी ठरेल.- अनुप कुमार, यू मुंबा, कर्णधार
यू मुंबा सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत
By admin | Published: March 05, 2016 3:04 AM