- रोहित नाईक , कोलकातासंपूर्ण सामन्यात पिछाडीवर राहिलेल्या मुंबईकरांनी अखेरच्या दोन मिनिटांमध्ये पूर्ण सामनाच फिरवताना बंगळुरू बुल्सच्या हातातील सामना अक्षरश: खेचून घेतला. यू मुंबाने २९-२८ अशी थरारक बाजी मारताना स्पर्धेतील तिसरा विजय मिळविला. बंगळुरूने मुंबईवर दोन लोण चढवले, तर मुंबईकरांनी बंगळुरूवर अखेरच्या मिनिटात निर्णायक लोण चढवून सामनाच फिरवला.अनूप कुमार, विशाल माने, सुरेंद्र नाडा आणि मोहित चिल्लर या स्टार खेळाडूंच्या अनुपस्थित यू मुंबाचा खेळ दडपणाखाली खालावला. अखेरच्या दोन मिनिटांपर्यंत बंगळूरू बुल्स २८-२४ असे आघाडीवर होते. बंगळुरूचा अमित राठी ‘डू आॅर डाय’ रेडमध्ये बाद झाला. तर, कर्णधार राकेश कुमार याने निर्णायक चढाई करताना मुंबईची पिछाडी २६-२८ अशी कमी केली. रिशांकने एका गुणाची कमाई केल्यानंतर जिवाने बंगळुरूचा कर्णधार सुरजित नरवालची निर्णायक पकड करून संघाला अखेरच्या मिनिटात २९-२८ असे आघाडीवर नेले. यानंतर रिशांकने अखेरच्या चढाईत केवळ वेळ घालवून मुंबईला विजय मिळवून दिला.मध्यंतराला बंगळुरूकडे २१-१० अशी भक्कम आघाडी होती. मात्र, मुंबईकरांनी हळूहळू गुण मिळवत अखेरच्या मिनिटात रोमांचक बाजी मारली. रिशांकने खोलवर चढाया करताना ४ बोनस गुणांसह एकूण ८ गुण मिळविले, तर राकेशने बचावावर भर दिला. बंगळुरूकडून बदली खेळाडू पवन कुमारने संघाला ९व्या मिनिटाला आघाडी मिळवून दिली.सुरुवातीला आमचा नियोजनानुसार खेळ झाला नाही. मात्र, दुसऱ्या सत्रात ती कसर भरून काढली. जिवाने केलेली पकड आणि रिशांकने घेतलेले बोनस गुण निर्णायक ठरले. बचाव अधिक भक्कम केल्यानेच विजय मिळवू शकलो.- राकेश कुमार, कर्णधार, यू मुंबा
यू मुंबाचा थरारक विजय
By admin | Published: February 11, 2016 3:21 AM