नवी दिल्ली : भारताचा अव्वल खेळाडू युकी भांबरी हा शुक्रवारपासून आर. के. खन्ना स्टेडियममध्ये चेक प्रजासत्ताकाविरुद्ध सुरू होणाऱ्या डेव्हिस चषक ‘विश्व ग्रुप प्ले आॅफ’ टेनिस लढतीच्या पहिल्या सामन्यात लुकास रोसोलविरुद्ध खेळणार आहे. या सामन्याची सोडत गुरुवारी जाहीर झाली. या वेळी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल, अ. भा. टेनिस संघटनेचे अध्यक्ष अनिल खन्ना आणि दोन्ही संघांतील खेळाडूंची उपस्थिती होती. पहिल्या दिवशी विश्व क्रमवारीत १२५ व्या स्थानावर असलेला युकी ८५ व्या रँकिंगवरील रोसोलविरुद्ध खेळेल. दुसऱ्या सामन्यात सोमदेव देवबर्मन याला प्रतिस्पर्धी देशाचा अव्वल खेळाडू आणि विश्व क्रमवारीत ४० व्या स्थानावर असलेला जिरी वेस्ली याच्याविरुद्ध दोन हात करावे लागणार आहे. शनिवारी दुहेरीत लिएंडर पेस-रोहन बोपण्णा या भारतीय जोडीला अॅडम पाब्लासेक- राडेक स्टेपनेक यांच्याविरुद्ध लढत द्यायची आहे. रविवारी परतीच्या एकेरीत युकीची गाठ वेस्लीविरुद्ध आणि सोमदेवची गाठ रोसोलविरुद्ध पडेल. ही लढत जिंकणारा संघ पुढील वर्षी १६ संघांचा समावेश असलेल्या एलिट विश्व गटासाठी पात्र ठरणार आहे. पराभूत संघ पुन्हा आपल्या गटात परत जाईल. (वृत्तसंस्था)चेकचे पारडे जड!भारत-चेक यांच्यात आतापर्यंतची ही चौथी लढत असेल. याआधी भारताने सर्व तिन्ही लढती गमावल्या. तीन वेळेचा चॅम्पियन आणि जगातील अव्वल संघ असलेल्या चेक संघाला विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. भारतीय संघदेखील घरच्या कोर्टवर सनसनाटी विजय नोंदविण्यास उत्सुक दिसतो.ड्रॉ आमच्या अनुकूल आहे, याचा लाभ घ्यावा लागेल. युकी पहिला आणि सोमदेव दुसरा सामना खेळणार आहे. दोन्ही लढतींचा निकाल आल्यावर स्थिती स्पष्ट होईल. दुहेरीत पेस-बोपण्णाची उपस्थिती आमच्यासाठी बोनस असेल. परतीच्या एकेरीतील निकालावर संपूर्ण लढतीचे चित्र विसंबून असेल.- आनंद अमृतराज, भारतीय कर्णधार
युकी-रोसोल, सोमदेव-वेस्ली लढत
By admin | Published: September 18, 2015 12:07 AM