चेन्नई : भारताचा डेव्हिस कप खेळाडू युकी भांबरीने पुनरागमन करताना मंगळवारी स्थानिक दावेदार रामकुमार रामनाथनचा एकतर्फी लढतीत ६-१, ६-१ ने सहज पराभव करीत एटीप चेन्नई ओपन टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. साकेत मायनेनी याला मात्र पराभव स्वीकारावा लागला. जागतिक क्रमवारीत ५७ व्या स्थानावर असलेल्या रशियाच्या मिखाइल यूज्नीने साकेतचा ६-४, ६-३ ने पराभव केला.मुख्य फेरीसाठी पात्र ठरल्यानंतर युकीने दुसरी फेरी गाठल्यामुळे त्याचे मनोधैर्य उंचावण्यास मदत झाली. दिग्गज प्रतिस्पर्ध्यांंविरुद्ध त्याची खरी परीक्षा होईल. मंगळवारी खेळल्या गेलेल्या अन्य लढतींमध्ये आठव्या मानांकित ताइपेच्या येन सून ल्यू याने मालदोव्हाच्या राडू एब्लोटचा ६-२, ६-१ ने पराभव केला तर ब्रिटनच्या एलिज बेदेनेने रशियाच्या गुइलेर्मो गार्सिया लोपेजविरुद्ध ६-३, ६-३ ने सरशी साधली. अर्जेंटिनाच्या रेंजो ओलिव्होने दुसऱ्या फेरीत स्थान मिळवताना नॉर्वेच्या कास्पर रुडची झुंज ७-६, ६-२ ने मोडून काढली. (वृत्तसंस्था)- टेनिस एल्बोच्या दुखापतीमुळे गेल्या मोसमात सहा महिने कोर्टपासून दूर असलेल्या युकीने यंदाच्या मोसमाची शानदार सुरुवात करताना रामकुमारवर सहज मात केली.युकीने ५२ मिनिटे खेळल्या गेलेल्या लढतीदरम्यान सर्व्हिसवर केवळ ७ गुण गमावले. दिल्लीच्या या खेळाडूने डेव्हिस कप संघातील सहकाऱ्यांची सर्व्हिस तीनवेळा भेदली आणि पहिला सेट केवळ २६ मिनिटांमध्ये जिंकला. दुसऱ्या सेटमध्येही युकीने वर्चस्व गाजवताना सहज सरशी साधली. युकीला पुढच्या फेरीत पाचवे मानांकन प्राप्त व जागतिक क्रमवारीत ४७ व्या स्थानावर असलेल्या बेनोइट पियरेच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
युकी दुसऱ्या फेरीत
By admin | Published: January 04, 2017 3:09 AM