- रोहित नाईक, जयपूरस्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या बलाढ्य यू मुंबाने पुन्हा एकदा आपला हिसका दाखवून बंगाल वॉरियर्सला ३०-१७ असे लोळवले. तर, यानंतर झालेल्या अत्यंत एकतर्फी लढतीत पटना पायरेट्सने जयपूर पिंक पँथर्सचा ४७-२४ असा फडशा पाडला.सवाई मानसिंग स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात मुंबईकरांनी भक्कम बचावाला वेगवान आक्रमणाची साथ देताना बंगाल वॉरियर्सच्या आव्हानातली हवा काढली. कर्णधार अनूप कुमारने सामन्यातील पहिल्याच चढाईत खाते उघडल्यानंतर मुंबईकरांनी तुफान खेळ करून आठव्याच मिनिटाला बंगलावर पहिला लोण चढवला. यू मुंबाच्या धडाक्यापुढे बंगालचा कोणताही खेळाडू चमक दाखवू शकला नाही. त्यामुळे कर्णधार नीलेश शिंदेच्याही चढाया अपयशी ठरला. मध्यंतराला मुंबईने १७-६ अशा १५ गुणांच्या एकतर्फी आघाडीने वर्चस्व राखले.यानंतरही मुंबईचा धडाका कमी झाला नाही. रिशांक देवाडिगा व अनूपच्या खोलवर चढाया आणि फझेल अत्राचली व विशाल माने यांच्या मजबूत पकडींच्या जोरावर यू मुंबाने २६व्या मिनिटाला बंगालवर दुसरा लोण चढवून २१-९ अशा १२ गुणांच्या मोठ्या आघाडीसह सामन्याचे चित्र स्पष्ट केले. अत्राचलीच्या पकडीपुढे बंगालचा प्रत्येक चढाईपटू दबावाखाली खेळताना दिसला. एक वेळ बंगालने बचावात्मक पवित्रा घेऊन मुंबईकरांना तिसऱ्या चढाईत पकडण्याची रणनीती आखली. मात्र, मुंबईच्या मोठ्या आघाडीमुळे त्यांची योजना अपयशी ठरली. मुंबईवर लोण चढवण्याची संधीही बंगालने साधली होती; मात्र मुंबईच्या भक्कम बचावापुढे त्यांचा निभाव लागला नाही. अखेरीस मुंबईकरांनी शानदार विजयावर शिक्का मारला. बंगालकडून जँग कून लीचा अष्टपैलू खेळ आणि नीलेशच्या पकडी चमकदार ठरल्या. मुंबईकडून चढाईत पुन्हा एकदा रिशांकने निर्णायक खेळ करताना ६, तर अनूपने ५ गुण मिळविले. बचावात फझेल व विशाल यांनी अनुक्रमे ६ व ३ गुण वसूल केले.यानंतर पटना पायरेट्सने यजमान जयपूर पिंक पँथर्सला ४७-२४ असे लोळवले. घरच्या मैदानावरील शेवटचा सामनाही हरल्याने जयपूरच्या चाहत्यांचा हिरमोड झाला. तुफानी हल्ला चढवताना पटनाने सुरुवातीला १०-० अशी जबरदस्त आघाडी घेतली. यजमानांना पहिल्या गुणासाठी ७व्या मिनिटापर्यंत वाट पाहावी लागली. मध्यंतराला २७-५ असा दबदबा राखलेल्या पटनाने जयपूरवर तब्बल ४ लोण चढवले. तर, जयपूरने पटनावर एक लोण चढवला; मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. पटनाला अर्धशतकापासून रोखल्याचे एकमेव समाधान जयपूरला मिळाले.बंगालविरुद्धच्या विजयात संघातील प्रत्येकाने सर्वोत्तम खेळ केला. यापुढेही विजयी मालिका कायम राखण्याचा निर्धार आहे. आमचे संरक्षण निर्णायक ठरले आणि याचे श्रेय फझेल अत्राचलीला द्यावे लागेल. त्याच्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला.- अनूप कुमार, कर्णधार, यू मुंबा
यू मुंबाचा धडाकेबाज विजय
By admin | Published: February 24, 2016 3:48 AM