बीजिंग : जगातील सर्वात वेगवान धावपटू जमैकाचा युसेन बोल्टने विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये दबदबा कायम राखत रविवारी १०० मीटर शर्यत जिंकली. त्याने अमेरिकेचा प्रतिस्पर्धी जस्टीन गॅटलिनला मागे टाकत ९.७९ सेकंदात बाजी मारली. या सुवर्णपदकानंतर त्याने पुन्हा एकदा १०० मीटर शर्यतीचा आपणच बादशाह असल्याचे सिद्ध केले. आॅलिम्पिक आणि विश्वविक्रमादित्य बोल्टने या वर्षी आपल्या फिटनेसला बाजूला ठेवत जगातील सर्वात वेगवान धावपटू म्हणून आपली प्रतिष्ठा कायम राखली आहे. गेल्या दोन वर्षांपासून जबरस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या गॅटलिनने ९.८० सेकंदांसह रौप्यपदक पटकाविले. अमेरिकेच्या ट्रेवोन ब्रोमेलने ९.९२ सेकंदांसह तिसरे स्थान पटकाविले. विद्यमान आॅलिम्पिक चॅम्पियन युसेन बोल्टने २००७ पासून आतापर्यंत झालेल्या मोठ्या स्पर्धेत १०० आणि २०० मीटरची शर्यत एकदाही गमावली नाही. तो सलग जिंकत आला आहे. २९ वर्षीय बोल्ट आता बीजिंग येथील बर्डस नेस्ट स्टेडियममध्ये १०० आणि २०० मीटरचे अशा दोन्ही शर्यतीचे जेतेपद मिळवण्याचा प्रयत्न करेल. याच स्टेडियमवर बोल्टने २००८ मध्ये बीजिंग आॅलिम्पिकमध्ये आपल्या यशाचा दबदबा निर्माण केला होता. आता २०० मीटरची शर्यत गुरुवारी होणार आहे. (वृत्तसंस्था)
युसेन बोल्ट सुसाटच!
By admin | Published: August 23, 2015 11:45 PM