नवी दिल्ली : अष्टपैलू खेळाडू म्हणून क्षमता बाळगणारा युसूफ पठाण याने यंदा रणजी मोसमात चांगली कामगिरी केली. आयपीएलमध्येही फलंदाजी त्याची जमेची बाजू ठरली. याच बळावर आगामी टी-२० विश्वचषकासाठी युसूफ भारतीय संघात स्थान पटकविण्यास उत्सुक आहे.भारताकडून मार्च २०१२ मध्ये अखेरचा टी-२० सामना खेळलेला युसूफ आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून सातत्यपूर्ण कामगिरी करीत आहे. रणजी मोसमात बडोद्यासाठीही त्याने योगदान दिले. मी अद्याप भारतीय संघाला योगदान देऊ शकतो, असा दावा युसूफने केला आहे. तो म्हणतो, ‘रणजी सत्र माझ्यासाठी लकी ठरले. केकेआर, आयपीएलसाठीदेखील चांगली कामगिरी बजावली. विजय हजारे वन डे स्पर्धेतही फलंदाजी- गोलंदाजीत यश मिळत आहे. फलंदाजी करतो तेव्हा धावांचा पाऊस पडतो. माझा डोळा टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळविण्याकडे असेल. कामगिरीत सातत्य कायम राखल्यास संघात हमखास स्थान मिळेल, यात दुमत नाही. चांगली कामगिरी कायम राहिली, तर निवडकर्त्यांनादेखील लक्ष देणे भाग पडते. निवडकर्ते माझ्या कामगिरीचा नक्की विचार करतील, अशी आशा आहे. युसूफ हा आॅफस्पिनर असल्याने मोक्याच्या क्षणी संघाच्या मदतीला धावून येतो. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या बळावर मी कठोर मेहनत घेत असल्याचे युसूफने सांगितले. मी मोठे लक्ष्य आखतो. मोठे लक्ष्य डोळ्यापुढे असेपर्यंत क्रिकेट खेळत राहण्याचा निर्धार केला आहे. कामगिरी चांगली असेल, तर संघदेखील तुमची सेवा घेण्यास आणि संधी देण्यास तयार असतो. युसूफने आपला भाऊ इरफान पठाण याच्यानंतर चार वर्षांनी २००७ साली भारतीय संघात पदार्पण केले. पहिल्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यादरम्यान युसूफने जगाचे लक्ष वेधले. - युसूफ पठाण
युसूफ पठाणची नजर टी-२० विश्वचषकावर!
By admin | Published: December 17, 2015 1:21 AM