ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - जबरदस्त इच्छाशक्तिच्या बळावर दुर्धर आजारावर मात करणाऱ्या युवराज सिंगने 2019च्या इंग्लंड व वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये खेळण्याचा निर्धार केला आहे. माझ्यामध्ये अजून भरपूर क्रिकेट शिल्लक असून कारण नसताना मला बाहेर बसायचं नाहीये असं युवीने रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
एकदिवसीय खेळाचा बादशाह अशी ओळख असलेला युवराजने भारताला असंख्य सामने जिंकण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली होती. 2007 मधला टी-20 वर्ल्ड कप असो वा 2011 मधला एकदिवसीय वर्ल्ड कप असो दोन्हींच्या विजयात युवराजची कामगिरी महत्त्वाची होती. 2000 मध्ये वयाच्या 18व्या वर्षी एकदिवसीय सामन्यात पदार्पण करणाऱ्या युवीला चार वर्षांपूर्वी कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले आणि त्याची या आजाराशी झुंज सुरू झाली. अखेर त्याने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, परंतु जुन्या युवराजचा झंझावात अद्याप तरी बघायला मिळालेला नाही.
क्रिकेटबद्दल माझ्या मनात असलेलं पॅशन महत्त्वाचं असल्याचं युवीनं म्हटलं असून आयपीएलच्या सामन्यांमध्ये हैदराबादकडून खेळताना युवराजला पुन्हा स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळत आहे. नुकत्याच झालेल्या टी - 20 वर्ल्ड कपमध्ये युवराज संपूर्ण अपयशी जरी ठरला नसला तरी त्याची कामगिरी तितकी समाधानकारकही नव्हती. त्यामुळे नव्या दमाचे अनेक फलंदाज स्पर्धेत असताना 34 वर्षांच्या युवराजवर पुन्हा सिद्ध करण्यासाठी चांगलंच दडपण असणार आहे.
ज्यावेळी मला वाटेल की मी इतकं खेळायला हवं होतं, ती वेळ आल्यावर मी थांबेन तोपर्यंत मी खेळत राहीन असे आत्मविश्वासपूर्ण उद्गार त्याने काढले आहेत. माझ्यामध्ये क्रिकेटची आणखी काही वर्षे शिल्लक असल्याचं त्यानं म्हटलं आहे.