नवी दिल्ली : २८ वर्षांनंतर विश्वचषक विजयाचे स्वप्न सत्यात उतरविण्यात महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या युवराज सिंगला २०१५च्या विश्वचषक संघात संधी मिळू शकते. स्थानिक क्रिकेटमधील युवीचा फॉर्म पाहता त्याच्या नावाची दखल निवड समिती घेईल का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. २०११च्या विश्वचषक विजयात ‘मॅन आॅफ दी टूर्नामेंट’ ठरलेल्या युवीला निवड समितीने २०१५साठीच्या संभाव्य ३० जणांच्या संघात स्थान दिले नाही. तसेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्याला ग्रेड सिस्टीममधूनही बाहेर केले. ‘बीसीसीआय’च्या या निर्णयाने चवताळलेल्या युवीने स्थानिक क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडला. त्याने गेल्या तीन सामन्यांत तीन शतके आणि एक अर्धशतक ठोकले. अष्टपैलू रवींद्र जडेजाला दुखापत झाल्यानंतर त्याची विश्वचषकमध्ये खेळण्याची शक्यता धूसर झाली आहे. जडेजा वेळेत फिट न झाल्यास अक्षर पटेल याला संधी मिळू शकते; परंतु क्रिकेट तज्ज्ञांच्या मते युवीचा फॉर्म पाहता त्याच्या नावाचा विचार होणे आवश्यक आहे. विश्वचषक संभाव्य संघात युवीला स्थान न दिल्यामुळे त्याच्या फॉर्म आणि फिटनेसवर अनेक चर्चा रंगल्या; मात्र पंजाबच्या या फलंदाजाने या सर्व चर्चांना सडेतोड उत्तर दिले. एका महिन्याच्या आत त्याने तीन शतके आणि एक अर्धशतक ठोकले. गेल्या रणजी सामन्यात अष्टपैलू कामगिरीमुळे त्याला ‘मॅन आॅफ दी मॅच’नेही गौरविण्यात आले. युवीने पटियालात हरियाणाविरुद्ध ५९ व १३० धावा, पुण्यात महाराष्ट्रविरुद्ध १३६ आणि राजकोटमध्ये सौराष्ट्रविरुद्ध १८२ धावा व तीन विकेट्स घेतल्या होत्या. युवराजच्या अनुभवाचा विचार केल्यास निवड समिती त्याच्या नावाचा विचार करू शकते. विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा मंगळवारी होणार आहे.
युवराज सिंगला मिळू शकते संधी ?
By admin | Published: January 05, 2015 3:16 AM