ऑनलाइन लोकमत
विशाखापट्टणम, दि. ९ - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे संपूर्ण जगभरात असंख्य चाहते आहेत, त्यांचे अनेक किस्से वेळोवेळी आपण ऐकतच असतो. पण आपल्या सचिनचा खुद्द भारतीय संघातही एक मोठा चाहता असून त्यानेही सचिनवरील आपले प्रेम आणि आदरभाव वेळोवेळी दर्शवला आहे. तो चाहता म्हणजे धडाकेबाज फलंदाज युवराज सिंग.. सचिन आणि युवराजची दोस्ती जगजाहीर असून युवराज सचिनला आपला आदर्श मानतो.
सध्या सुरू असलेल्या आयपीएलच्या मोसमात काल (रविवार) सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स दरम्यान रंगलेल्या सामन्यात हैदराबादकडून खेळणा-या युवराजने मुंबईविरोधात ३९ धावांची शानदार खेळी फटकावली. आणि त्यानंतर हैदराबादने उत्तम गोलंदाजी करत मुंबईचा ८५ धावांनी पराभव केला. हैदराबाद-मुंबई संघादरम्यान मैदानावर हे युद्ध रंगले होते, मात्र सामना संपताक्षणीच युवराजने त्याचा आदर्श आणि मुंबई इंडियन्सचा मेंटॉर असलेल्या सचिनकडे धाव घेतली आणि तो त्याच्या पाया पडला. आयपीएलच्या या सत्रात युवराजची ही दुसरी मॅच होती आणि गेल्या सामन्याच्या तुलनेत कालच्या सामन्यात त्याने खूपच चांगली कामगिरी केली. आपली चांगली खेळी आणि संघानेही सामना जिंकल्याच्या दुहेरी आनंदात असलेल्या युवराजला आपल्या आदर्शचा बिलकूल विसर पडला नाही. हैजराबादने सामना जिंकताच इतर खेळाडूंसोबत जल्लोष करत मैदानावर आलेल्या युवराजने ग्राऊंडवर उपस्थित असलेल्या सचिनकडे धाव घेत त्याचे आशिर्वाद घेतले.
दरम्यान यापूर्वीही युवराज सचिनच्या पाया प़डला होता. जुलै २०१४मध्ये लॉर्ड बिसेटेनरी सेलिब्रेशन दरम्यान युवारज व सचिन आमनेसामने आले होते. सचिन मेर्लेबोन क्रिकेट क्लबचा कप्तान होता तर युवराज 'रेस्ट ऑफ दि वर्ल्ड टीम'तर्फे खेळत होता. त्यावेळी युवराजने १३४ चेंडूत १३२ धावांची शानदार खेळी केली मात्र सचिनच्याच गोलंदाजीवर तो बाद झाला. क्रीज सोडण्यापूर्वी युवराज सचिनच्या पाया पडला आणि त्याचा आदरभाव प्रकट केला.