ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - काही दिवसांपूर्वी व्हॉट्स अपवर एक जोक आला होता. आपलं प्रेम युवराजच्या करिअरसारखं असावं, सतत उभारी घेणारं. युवराजची खेळी पाहत असताना अचानक हा जोक आठवला. जबरदस्त इच्छाशक्तीच्या बळावर कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर मात करणाऱ्या युवराज सिंगने कटक वनडेमध्ये धडाकेबाज खेळीचे प्रदर्शन करत 14 वे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतक पूर्ण केले. युवराजने 98 चेंडूचा सामना करताना एक षटकार आणि 15 चौकारासह झंझावाती शतक पूर्ण केले. युवराज सिंगने आजच्या सामन्यात 127 चेंडूचा सामना करताना तीन षटकार आणि 21 चौकारांसह 150 धावांची खेळी केली. यावेळी त्याने इंग्लंड विरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे.
युवराजने 294 एकदिवसीय सामन्यात फलंदाजी करताना 8,344 केल्या आहेत. यावेळी त्याने 14 शतकांसह 50 अर्धशतकं ठोकली आहेत. तर गोलंदाजीमध्ये त्याने 111 बळी घेतले आहेत. शिवाय 2007 च्या टी-20 आणि 2011 च्या एकदिवसीय विश्वचषकात त्याला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला आहे.
2011 च्या एकदिवसीय विश्वचषकामध्ये युवराजने शेवटचे शतक केले होते. त्यानंतर खराब फॉर्म किंवा दुखापतीमुळे तो सतत संघातून आत-बाहेर येत होता.
2000 मध्ये वयाच्या 18व्या वर्षी एकदिवसीय सामन्यात पदार्पण करणाऱ्या युवीला चार वर्षांपूर्वी कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले आणि त्याची या आजाराशी झुंज सुरू झाली. कॅन्सरवर मात करत त्याने संघात अनेकवेळा पुनरागमन केले. मात्र, त्याला हवी तशी सुरुवात मिळत नव्हती. पुण्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात चांगल्या सुरुवातीनंतरही त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आले. पण आज सुरुवातीला भारतीय संघाला तीन धक्के बसल्यानंतर युवराजने धोनीच्या साथीने संघाची समाधानकारक धावसंख्या उभी केली.
आजची युवराजची खेळी पाहून क्रीडाप्रेमींना 2011 पूर्वीचा युवराज सिंग नक्कीच आठवला असेल यात काही शंकाच नाही. भारतीय क्रिकेट इतिहासात युवराजचे मोलाचे योगदान आहे. मर्यादित षटकांच्या खेळाचा बादशाह अशी ओळख असलेल्या युवराजने भारताला असंख्य सामने जिंकण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली आहे. 2007 मधला टी-20 वर्ल्ड कप असो वा 2011 मधला एकदिवसीय वर्ल्डकप असो दोन्हींच्या विजयात युवराजची कामगिरी महत्त्वाची होती.