मुंबई : ‘नवीन वर्षाची उत्सुकता सर्वांनाच आहे. मीदेखील काही गोष्टी ठरविल्या आहेत. यानुसार टीम इंडियामध्ये पुनरागमनाचा माझा निर्धार आहेच, त्यासोबतच देशातील कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी अधिक मदतकेंद्र उभारण्याचाही माझा प्रयत्न असेल,’ असे भारताचा स्टार अष्टपैलू युवराज सिंग याने सांगितले.नाताळ सणाचा आनंद कर्करोगग्रस्त लहान मुलांसोबत साजरा करण्याच्या निमित्ताने युवराजने शुक्रवारी मुंबईतील सेंट ज्युड इंडिया चाईल्डकेअर सेंटर्सला भेट दिली. यावेळी युवीने नव्या वर्षातील आपल्या नियोजनाविषयी सांगितले. ‘सिक्सर किंग’ म्हणून ओळखला जाणाऱ्या या धडाकेबाज फलंदाजाला पुन्हा एकदा भारतासाठी खेळताना पाहण्यासाठी क्रिकेटचाहते उत्सुक आहेत. संघातील पुनरागमनाविषयी युवीला विचारले असता तो म्हणाला की, ‘निश्चितच संघातील पुनरागमन माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी माझे प्रयत्न सुरूच आहेत. परंतु, आगामी नव्या वर्षात मला कर्करोगग्रस्तांसाठी विशेष कार्य करायचे आहे. यासाठी मी कर्करोगग्रस्तांसाठी मदत केंद्र उभारण्याचा प्रयत्न करेल.’कर्करोगग्रस्त मुलांना भेटण्याच्या अनुभवाविषयी युवी म्हणाला की, ‘या लहान मुलांना भेटून खूप आनंद झाला. ज्या केअर सेंटरमध्ये जे उपचार घेत आहेत, तेथील सोयी-सुविधा खूप चांगल्या आहेत. आज जगभरात योग्य उपचार मिळत नसल्याने अनेकांचा कर्करोगामुळे मृत्यू होत आहे. अशा रुग्णांसाठी आपण पुढे येणे गरजेचे आहे. मी येथे मुलांना हसत हसत लढा देण्याचा संदेश देण्यासाठी आलेलो; पण ही बच्चेकंपनी आनंदात राहत असल्याचे कळाल्यानंतर खूप प्रभावित झालो. त्यांचे प्रसन्न चेहरे मोठा आत्मविश्वास देऊन गेले’.स्वच्छतेचे महत्त्वपालकांनो आपल्या मुलांना उपचार देताना हिम्मत गमावू नका. जेव्हा कधी पाठिंबा आणि मदत मिळत नाही तेव्हा खूप अडचणी होतात. या मुलांसाठी परिवाराचा पाठिंबा सर्वात महत्त्वाचा असतो. तसेच, कर्करोगाविरोधात लढा देताना स्वच्छता राखणे अत्यंत गरजेचे आहे. स्वच्छतेची कर्करोगाविरोधातील लढ्यात महत्त्वाची भूमिका आहे. - युवराज सिंग
टीम इंडियात पुनरागमनाचे युवराजचे लक्ष्य!
By admin | Published: December 24, 2016 1:15 AM