ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १५ - भारताचा वेगवान गोलंदाज झहीर खानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारत असल्याची घोषणा केली आहे. ३७ वर्षीय झहीर खानने ९२ कसोटी, २०० एकदिवसीय आणि १७ टी -२० सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले असून त्याच्या खात्यात तब्बल ६१० विकेट्स जमा आहेत.
महाराष्ट्रातील श्रीरामपूरमध्ये जन्मलेल्या झहीर खानने रणजी ट्रॉफीत मुंबईकडून खेळताना डावखु-या मा-याने छाप पाडली. सातत्यपूर्ण कामगिरीमुळे झहीरने २००० मध्ये भारतीय संघात पदार्पण केले व अवघ्या काही वर्षातच तो भारतीय गोलंदाजीचा आधारस्तंभच बनला. चेंडू नवीन असो किंवा जुना झहीरचा भेदक मारा आणि चेंडू स्विंग करण्याची त्याची शैली यामुळे प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांची भंबेरी उडायची. मात्र गेल्या काही वर्षांपासून झहीरला दुखापतीने ग्रासले आणि फिटनेसअभावी त्याला संघातून वगळण्यात आले होते. झहीरने २०१४ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला असून शेवटचा एकदिवसीय सामना तो २०१२ श्रीलंकाविरुद्ध खेळला होता.
झहीरने ९२ कसोटी सामन्यांमध्ये ३२.९४ च्या सरासरीने ३११ विकेट्स घेतल्या आहेत. तर २०० एकदिवसीय सामन्यात २९. ४३ च्या सरासरीने २८२ बळी त्याने टिपले आहेत. १७ टी - २० सामन्यात झहीरने १७ विकेट्स घेतल्या आहेत. झहीरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला असला तरी स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये तो खेळणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.