ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 12 - ब-याच नाटयमय घडामोडीनंतर अखेर मंगळवारी रात्री उशिरा बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांच्या नावाची घोषणा केली. त्याचवेळी सपोर्ट स्टाफमध्ये गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून झहीर खान आणि राहुल द्रविड यांची निवड केली आहे. झहीर खान आणि राहुल द्रविड यांच्या निवडीने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण त्यांची नावे शेवटपर्यंत चर्चेत नव्हती. राहुल द्रविड सध्या भारताच्या ज्यूनियर क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक असून, त्याच्याकडे आता परदेश दौऱ्यांसाठी फलंदाजी सल्लागार ही नवी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
झहीर आणि राहुल द्रविड या दोघांनी भारतीय क्रिकेटला दिलेले योगदान लक्षात घेता त्यांच्या अनुभवाचा विराट कोहलीच्या संघाला नक्कीच फायदा होईल. पण या दोघांच्या अचानक झालेल्या निवडीने काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. खरतर क्रिकेट सल्लागार समितीने बीसीसीआयला सांगून मुख्य प्रशिक्षकाप्रमाणे सपोर्ट स्टाफसाठी अर्ज मागवायला हवे होते. पण यापैकी कुठल्याही प्रक्रियेचे पालन झाले नाही. त्यामुळे रवी शास्त्री आणि विराट कोहलीवर लगाम ठेवण्यासाठी झहीर आणि राहुलची संघात वर्णी लागल्याची चर्चा आहे.
आणखी वाचा
प्रशिक्षक निवडण्याची जबाबदारी असलेल्या सल्लागार समितीमधील सौरव गांगुलीचा रवी शास्त्रीच्या नावाला विरोध होता. त्यामुळे झहीर आणि द्रविडच्या निवडीमागे गांगुली असल्याची चर्चा आहे. मागच्यावर्षी प्रशिक्षक निवडताना अखेरच्या क्षणी अनिल कुंबळेची एंट्री झाल्याने रवी शास्त्रींचा पत्ता कट झाला होता. त्यावेळी शास्त्रींनी सौरव गांगुलीवर टीकाही केली होती. यावेळी सुद्धा शास्त्री प्रशिक्षकपदासाठी फार उत्सुक नव्हते.
पण सचिन तेंडुलकरने शब्द टाकल्यानंतर त्यांनी प्रशिक्षकपदासाठी अर्ज भरला. सचिन आणि विराट दोघांची शास्त्रींच्या नावाला पसंती असल्याने प्रशिक्षकपदी शास्त्रींची निवड निश्चित मानली जात होती. सपोर्ट स्टाफ म्हणून झहीर खान आणि राहुल द्रविडची निवड ही रवी शास्त्रींवर लादली गेलीय असेही म्हणता येईल. अनिल कुंबळेच्या आधीचे भारताच्या सीनियर संघाचे मुख्य प्रशिक्षक ग्रेग चॅपल, गॅरी कस्टर्न आणि डंकन फ्लेचर यांना त्यांच्या पसंतीचा सपोर्ट स्टाफ मिळाला होता. चॅपल यांनी सपोर्ट स्टाफमध्ये इयन फ्रेझर, कस्टर्न यांनी पॅड अपटॉन, इरीक सीमॉन्स आणि डंकन फ्लेचर यांनी ट्रेव्हर पेनीची निवड केली होती. त्यातुलनेत शास्त्रींना ते स्वातंत्र्य मिळालेले नाहीय.