नवी दिल्ली : भारताची मुष्टियोद्धा निकहत झरीनची इस्तंबूलमध्ये सुरू असलेल्या बासफोरस मुष्टियुद्ध स्पर्धेत यशस्वी घोडदौड सुरू आहे. झरीनने ५१ किलो गटात शुक्रवारी कझाखस्तानची दोन वेळेची विश्वविजेती नजीम कजाईबेचा पराभव केला. या सनसनाटी विजयासह झरीनने दिमाखात उपांत्य फेरीत धडक मारली.
झरीनने नजीमविरुद्ध आत्मविश्वासाने लढत जिंकली. २०१४ आणि २०१६च्या विश्व अजिंक्यपदची विजेती कजाईबेचा ४-१ ने पराभव करीत पदक निश्चित केले. झरीनशिवाय २०१८ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा सुवर्ण विजेता गौरव सोळंकी यानेदेखील उपांत्य फेरी गाठली.
गौरव याने पुरुषांच्या ५७ किलो वजन गटात स्थानिक मुष्टियोद्धा अयकोल मिजान याच्यावर ४-१ ने असा एकतर्फी विजय नोंदविला. भारताच्या अन्य महिला मुष्टियोद्धे सोनिया लाठेर (५७ किलो), परवीन (६० किलो) आणि ज्योती (६९ किलो) या मात्र उपांत्य फेरीत पराभूत होताच स्पर्धेबाहेर झाल्या.
शिव थापाचे आव्हान संपुष्टातपुरुष गटात स्टार आणि पदकाचा संभाव्य दावेदार असलेल्या शिव थापा (६३ किलो) हा तुर्कस्थानचा हकान डोगान याच्याकडून १-४ ने अनपेक्षितपणे पराभूत झाला. भारतासाठी हा अनपेक्षित निकाल ठरला.