हॅमिल्टन : झिम्बाब्वे १९९९च्या इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकातील कामगिरीची पुनरावृत्ती करणार का? त्या वेळी द.आफ्रिकेला नमवीत झिम्बाब्वेने खळबळ उडवून दिली होती. यंदाच्या विश्वचषकात उद्या रविवारी हे दोन्ही संघ पहिल्या सामन्यात पुन्हा एकमेकांपुढे येणार आहेत.‘चोकर’चा ठपका पुसून काढण्याच्या निर्धाराने आफ्रिकेचा संघ या विश्वचषकात खेळेल. त्यांच्या पुढे तुलनेने कमकुवत झिम्बाब्वे असेल. सराव सामन्यात न्यूझीलंड व आफ्रिकेला तुल्यबळ लढत देणाऱ्या झिम्बाब्वेत उलटफेर करण्याची क्षमता आहे.पहिल्या सराव सामन्यात या संघाने १५७ धावांत न्यूझीलंडचे सात गडी बाद केले. नंतर पाऊस आल्याने सामना रद्द झाला. दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेने लंकेला सात गड्यांनी नमविले. दुसरीकडे १९९१ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणारा आफ्रिकेचा संघ मोक्याच्या क्षणी धाराशायी होत असल्याने उपांत्य फेरीच्या पुढे गेलेला नाही. यंदा या संघाचे नेतृत्व डिव्हिलियर्सकडे आहे. त्याने विंडीजविरुद्ध अवघ्या ३१ चेंडूत जलद शतक ठोकले. हा संघ गोलंदाजी आणि फलंदाजीत संतुलित असून, क्षेत्ररक्षणही उच्च दर्जाचे आहे. संघाकडे हाशीम अमलासारखा सर्वोत्कृष्ट फलंदाज असून, तो क्विंटन डी कॉकसोबत सलामीला येईल. नंतर फाफ डुप्लासिस व जेपी डुमिनी हे विश्वसनीय फलंदाज आहेत. वेगवान माऱ्यासाठी डेल स्टेन आणि मोर्ने मोर्केलच्या सोबतीला व्हर्नोन फिलॅण्डर आणि काईल एबोट, तसेच फिरकीपटू इम्रान ताहीर आणि अॅरोन फर्गिसो आहेत. झिम्बाब्वेला अलीकडे विजयासाठी झगडावे लागले. बांगलादेशने त्यांचा ५-०ने पराभव केला. पण, आॅस्ट्रेलियन कोच डेव्ह व्हॉटमोर यांनी प्रशिक्षणाची जबाबदारी स्वीकारल्याने संघात नव्याने उत्साह संचारला. सराव सामन्यातील फॉर्म कायम राखण्यात झिम्बाब्वेला यश आले, तर १९९९च्या इंग्लंडमधील कामगिरीची पुनरावृत्ती निश्चितपणे होईल. (वृत्तसंस्था)दक्षिण आफ्रिका : एबी डिव्हिलियर्स (कर्णधार), हाशिम आमला (उपकर्णधार), कायले अॅबॉट, फरहान बेहार्डीन, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), जीन पॉल डुमीनी, फा डू प्लेसिस, इमरान ताहीर, डेव्हिड मिलर, मॉर्ने मॉर्केल, वॅन पार्नेल, अॅरोन फंगिसो, वेर्नोन फिलेंडर, डेल स्टेन.झिम्बाब्वे : एल्टॉन चिगुम्बूरा (कर्णधार), रेगिस चकाब्वा, तेंडाई चतारा, चामू चिभाभा, क्रेग एर्विन, तफाड्जवा कामुंगोजी, हॅमिल्टन मसाकाड्झा, स्टुअर्ट मात्सीकेंयेरी, सोलोमोन मिरे, तवांडा मुपारिवा, तिनाशे पन्यांगरा, सिकंदर रझा, बेंडन टेलर (यष्टीरक्षक), प्रोस्पर उत्सेया, सिन विलियम्स.आफ्रिकेविरुद्ध उत्कृष्ट खेळ करू : एल्टोन हॅमिल्टन : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रविवारी होणाऱ्या वर्ल्डकपमधील पहिल्या लढतीत आम्ही शंभर टक्के योगदान देऊ, असे मत झिम्बाब्वेचा कर्णधार एल्टोन चिगुंबुरा याने व्यक्त केले आहे़ २८ वर्षीय कर्णधार म्हणाला की, पावसाचा अडथळा आलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या सराव लढतीत आमचे चांगले प्रदर्शन राहिले होते, तर श्रीलंकेला आम्ही धूळ चारली होती़ त्यामुळे संघातील खेळाडूंना आत्मविश्वास उंचावला आहे़ याच बळावर आम्ही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वोत्कृष्ट कामगिरी करू .