ऑनलाइन लोकमत
कोलंबो, दि. 12 - झिम्बाब्वेविरोधातील एकदिवसीय मालिकेत 3-2 ने पराभव झाल्यानंतर अँजेलो मॅथ्यूजने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. मॅथ्यूज तिन्ही फॉरमॅटच्या कर्णधारपदावरुन पायउतार झाला आहे. झिम्बाब्वेविरोधात झालेला पराभव आपल्या करिअरमधील सर्वात वाईट पराभव असल्याचं सांगत मॅथ्यूजने राजीनामा दिला आहे. त्याने आपला निर्णय निवड समितीला कळवला आहे. याआधी इंग्लंडमध्ये नुकत्याच झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील खराब प्रदर्शनानंतर श्रीलंकेचे मुख्य प्रशिक्षक ग्रॅहम फोर्ड यांनीही राजीनामा दिला होता.
आणखी वाचा
मॅथ्यूजच्या आपल्या नेतृत्वात 34 कसोटी, 98 एकदिवसीय आणि 12 टी20 सामने खेळले आहेत. 2013 मध्ये महेला जयवर्धनेने राजीनामा दिल्यानंतर मॅथ्यूजकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं होतं. 25 व्या वर्षी कर्णधारपद मिळवणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला होता. त्याच्या कार्यकाळातील जास्तीत जास्त मर्यादित ओव्हर्स सामने खेळावे लागले. कसोटीमध्ये मॅथ्यूज चांगली कामगिरी करु शकला नाही. 2014 मध्ये इंग्लंडविरोधात झालेल्या कसोटी मालिकेत मॅथ्यूजने महत्वाची भूमिका निभावली होती. तसंच गतवर्षी ऑस्टेलियाचा व्हाईवटवॉश करत पराभवाची धूळ चारली होती.
मॅथ्यूजने 34 कसोटी सामन्यांचं नेतृत्व केलं, ज्यापैकी 13 सामन्यात श्रीलंकेला विजय मिळाला, तर 15 सामन्यात पराभव पत्करावा लागला. मॅथ्यूजच्या नेतृत्वात श्रीलंकेने 47 वन डे सामन्यांमध्ये विजय मिळवला. तर 46 पराभव झाले. टी-20 मध्ये मॅथ्यूजच्या नेतृत्तात श्रीलंकेने चार विजय मिळवले, तर सात पराभव झाले.
झिम्बाब्वेने मालिका जिंकली
ऑफ स्पिनर सिकंदर रजाच्या शानदार फिरकीनंतर सलामीवीर हॅमिल्टन मसाकद्जा याने झळकावलेल्या अर्धशतकाच्या जोरावर झिम्बाब्वेने पाचव्या व अंतिम एकदिवसीय सामन्यात यजमान श्रीलंकेला ३ विकेट्सने नमवून मालिका ३-२ अशी जिंकली. विशेष म्हणजे, झिम्बाब्वेने गेल्या आठ वर्षात पहिल्यांदा विदेशामध्ये मालिका जिंकली.
श्रीलंकेन दिलेल्या २०४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेने हॅमिल्टनच्या ७३ धावांच्या खेळीच्या जोरावर बाजी मारली. हॅमिल्टनने ८६ चेंडूत ९ चौकार व एका षटकारासह आपली खेळी सजवली. त्याच्याशिवाय सोलोमन मायर (४३) याच्यासह ९२ धावांची सलामी करत हॅमिल्टनने संघाला चांगली सुरुवात करुन दिली होती. यानंतर हॅमिल्टन - तारिसाई मुसाकांदा (३७) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी करुन संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. झिम्बाब्वेने फलंदाजांच्या जोरावर ३८.१ षटकात ७ बाद २०४ धावा काढल्या. सामनावीर ठरलेल्या रजाने अंतिम क्षणी महत्त्वपुर्ण खेळी करताना २७ चेंडूत एक चौकार व दोन षटकारांसह नाबाद २७ धावा चोपल्या. तत्पूर्वी, रजाच्या (३/२१) भेदक माऱ्यापुढे श्रीलंकेचा डाव मर्यादित राहिला. ग्रीम केमरनेही (२/२३) चांगला मारा करुन लंकेच्या फलंदाजांना जखडवून ठेवले. सलामीवीर धनुष्का गुणतिलका (५२) आणि असेला गुणरत्ने (नाबाद ५९) यांच्याव्यतिरिक्त इतर फलंदाजांना छाप पाडण्यात अपयश आले. एकवेळ लंकेची ४२व्या षटकात ८ बाद १५३ धावा अशी अवस्था होती. परंतु, गुणरत्ने आणि दुष्मंता चमीरा (नाबाद १८) यांनी नवव्या विकेटसाठी नाबाद ५० धावांची भागीदारी करुन संघाला दोनशेच्या पुढे मजल मारुन दिली होती.