गाले : सोलोमोन मायर याने झळकावलेल्या कारकिर्दितील पहिल्या शतकाच्या जोरावर झिम्बाब्वेने विक्रमी विजयाची नोंद करताना श्रीलंकेला पहिल्या एकदिवसीय सामन्यात सहा विकेट्सने धक्का दिला. सिकंदर राझा आणि सीन विलियम्स यांनीही शानदार अर्धशतकी खेळी करत झिम्बाब्वेला विजयी केले. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने ५ बाद ३१६ धावांचा डोंगर रचल्यानंतर झिम्बाब्वेने ४७.४ षटकातच ४ फलंदाजांच्या मोबदल्यात ३२२ धावा काढल्या. गाले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या धमाकेदार सामन्यात झिम्बाब्वेच्या मायरने केलेल्या फटकेबाजीमध्ये लंकेच्या सर्वच गोलंदाजांची धुलाई झाली. सलामीवीर हॅमिल्टन मसक्झादा (५) आणि क्रेग एर्विन (१८) स्वस्तात परतल्यानंतरही कोणतेच दडपण न घेता मायरने विलियम्ससह तिसऱ्या विकेटसाठी १६१ धावांची भागीदारी केली. मायरने ९६ चेंडूंमध्ये १४ खणखणीत चौकारांसह ११२ धावांचा तडाखा देत लंकेच्या हातातीला सामना हिसकावून नेला.अलेस्का गुणरत्नेने आपल्याच गोलंदाजीवर मायरचा झेल घेत ही जोडी फोडली खरी, मात्र तोपर्यंत विजय झिम्बाब्वेच्या जवळ आला होता. मायर बाद झाल्यानंतर काहीवेळाने विलियम्स ६९ धावा काढून बाद झाला. यानंतर, सिकंदर (५६ चेंडूत नाबाद ६७) आणि माल्कम वॉलर (२९ चेंडू नाबाद ४०) यांनी १०२ धावांची भागीदारी करुन विजयावर शिक्का मारला. (वृत्तसंस्था)
विक्रमी विजयासह झिम्बाब्वेने केले ‘लंकादहन’
By admin | Published: July 01, 2017 2:06 AM