कराची : झिम्बाब्वेचा क्रिकेट संघ मोठ्या सुरक्षा व्यवस्थेत मंगळवारी पाकिस्तानातील लाहोर येथे दाखल झाला. सन २००९ साली घडलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर झिम्बाब्वेच्या संघासाठी अभूतपूर्व सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली होती. लाहोर येथे ६ वर्षांपूर्वी श्रीलंका संघाच्या बसवर आतंकवाद्यांनी हल्ला केला होता. त्यानंतर क्रिकेट खेळणाऱ्या देशांनी पाकिस्तानात क्रिकेट सामने खेळण्यास नकार दिला होता. हल्ल्याच्या घटनेनंतर पाकिस्तानात खेळणारा झिम्बाब्वे पहिलाच संघ ठरला आहे. हा संघ लाहोर येथे दोन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे.झिम्बाब्वे संघ अलामा इकबाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाल्यानंतर सरळ हॉटेलमध्ये पोहोचला. पंजाबचे गृहमंत्री शुजा खानजादा आणि पीसीबीचे जाकीर खान यांनी पाहुण्या संघाचे स्वागत केले. झिम्बाब्वेच्या संघासाठी अभुतपूर्व सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली होती. शेकडोंच्या संख्येने पोलिस डोळ्यांत तेल घालून सुरक्षेत व्यस्त होते. त्यांचे वास्तव्य असलेल्या हॉटेलपर्यंतच्या रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणावर सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली होती. पंजाबचे गृहमंत्री खानजादा यांनी माध्यमांशी संवाद साधताना पाकिस्तान क्रीडा मंडळासाठी हा महत्त्वाचा क्षण असल्याचे कबूल केले. अखेर कोणतातरी संघ कसोटी सामना खेळण्यासाठी पाकिस्तानात दाखल झाला आहे. आम्ही ही मालिका सर्वार्थाने यशस्वी करून दाखवू, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. दोन्ही संघानी आज गद्दाफी स्टेडिअमवर सराव केला. त्या पार्श्वभूमीवर परिसराची नाकाबंदी करण्यात आली आहे. स्टेडियमच्या परिसरात ठिकठिकाणी सुरक्षा चौक्या तयार करण्यात आल्या आहेत. अर्धसैनिक दलाचे सुरक्षारक्षक २४ तास तैनात करण्यात आले आहेत. शिवाय हेलिकॉप्टरच्या साह्याने देखील पहारा ठेवण्यात आला आहे.(वृत्तसंस्था)४टी-२० सामन्यासाठी पाकिस्तान संघ जाहीर करण्यात आला आहे. त्यात अनुभवी खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून संघाबाहेर असलेल्या शोएब मलिक आणि मोहम्मद सामी यांची वर्णी या संघात लागली आहे. ४संघात शाहिद आफ्रीदी (कर्णधार), अहमद शहजाद, मोहंम्मद हाफीज, उमर अकमल, शोएब मलिक, सर्फराज अहमद, हमाद आजम, वहाब रियाज, बिलावल भट्टी, नौमान अन्वर, अन्वर अली, मोहम्मद रिजवान, इमाद वसीम, मुख्तार अहमद, मोहम्मद सामी यांचा समावेश आहे.
झिम्बाब्वेचा संघ पाकमध्ये दाखल
By admin | Published: May 20, 2015 1:30 AM