कोलंबो : तळाच्या फळीतील सिकंदर रजाची चमकदार खेळी व मॅलकम वॉलेरसोबत त्याची अभेद्य शतकी भागीदारी याच्या जोरावर झिम्बाब्वेने निराशाजनक सुरुवातीतून सावरत श्रीलंकेविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात रविवारी तिसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात ६ बाद २५२ धावांची मजल मारली आणि आपली स्थिती मजबूत केली. झिम्बाब्वेने पहिल्या डावातील शतकवीर क्रेग इरविनसह आघाडीच्या चार फलंदाजांना २३ धावांत गमावले होते. रजाने त्यानंतर रंगना हेराथच्या (८५ धावात चार बळी) नेतृत्वाखालील श्रीलंकन आक्रमणाचा समर्थपणे सामना केला. रजा ९७ धावा काढून खेळत आहे. रजाने पीटर मूरसोबत (४०) सहाव्या विकेटसाठी ८६ धावांची भागीदारी करीत झिम्बाब्वेचा डाव सावरला. त्यानंतर वॉरेलसोबत (नाबाद ५७) सातव्या विकेटसाठी १०७ धावांची अभेद्य भागीदारी करीत संघाला मजबूत स्थिती गाठून दिली. झिम्बाब्वेकडे एकूण २६२ धावांची आघाडी आहे. त्याआधी, श्रीलंकेचा पहिला डाव सकाळच्या सत्रात ३४६ धावांत संपुष्टात आला. त्यामुळे पहिल्या डावात ३५६ धावा काढणाऱ्या झिम्बाब्वे संघाला १० धावांची आघाडी घेता आली. रजाने कारकिर्दीतील सर्वोच्च खेळी केली. तो पहिल्या कसोटी शतकापासून केवळ तीन धावा दूर आहे. त्याने आतापर्यंत १५८ चेंडूंना सामोरे जाताना ७ चौकार व १ षटकार लगावला. वॉलेरने आक्रमक खेळी केली. त्याने ७६ चेंडूंना सामोरे जाताना ८ चौकार लगावले. दुसऱ्या डावात झिम्बाब्वेची सुरुवात निराशाजनक झाली. त्याचे आघाडीचे चार फलंदाज झटपट माघारी परतले. त्यात पहिल्या डावात १६० धावांची खेळी करणारा इरविन (५) याचाही समावेश होता. डावखुरा फिरकीपटू हेराथने हॅमिल्टन मास्काद्जा, तारिसाई मुसाकांडा व रेगिस चकाबवा यांना माघारी परतवले. आॅफ स्पिनर दिलरुवान परेराने इरविनचा महत्त्वाचा बळी घेतला. सीन विलियम्सने (२२) रजासोबत काही वेळ पडझड थोपविली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ३६ धावांची भागीदारी केली. हेराथने विलियम्सला बोल्ड केले. त्यानंतर रजाने मूरच्या साथीने डाव सावरला. लाहिरू कुमारने मुरला बाद करीत ही भागीदारी संपुष्टात आणली. त्याआधी, झिम्बाब्वेचा कर्णधार ग्रीम क्रेमरने कारकिर्दीत प्रथमच पाच बळी घेण्याचा पराक्रम केला. लेगस्पिनर क्रेमरने १२५ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेतले. श्रीलंकेने आज ७ बाद २९३ धावसंख्येवरुन पुढे खेळण्यास सुरुवात केली. क्रेमरने सुरंगा लखमल (१४) याला बाद केल्यानंतर असेला गुणरत्ने (४५) याला तंबूचा मार्ग दाखवित श्रीलंकेचा डाव गुंडाळला. गुणरत्नेने हेराथसोबत (२२) आठव्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी केली. दुखापतीत उपचार घेतल्यानंतर गुणरत्ने ११० चेंडू खेळला. त्यामुळे श्रीलंकेला सकाळच्या सत्रात धावसंख्येत ५३ धावांची भर घालता आली. झिम्बाब्वेतर्फे क्रेमर व्यतिरिक्त सीन विलियम्सने दोन व डोनाल्ड टिरिपानोने एक बळी घेतला. (वृत्तसंस्था)
लंकेविरुद्ध झिम्बाब्वे मजबूत स्थितीत
By admin | Published: July 17, 2017 12:40 AM