Zurich Diamond League LIVE : भारताचा लांब उडीपटू लांब उडीपटू मुरली श्रीशंकर ( Murali Sreeshankar) हा डायमंड लीगमध्ये तीन स्पर्धानंतर १४ गुणांसह सध्या तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. २०२२ च्या राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या मुरलीने आज डायमंड लीगमध्ये ८ मीटर अंतर पार नाही करू शकला अन् त्याला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. डायमंड लीगमधील ही त्याची दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली. त्याने जून महिन्यात पॅरिस येथे तिसरे स्थान पटकावले होते. तो डायमंड लीगच्या फायनल फेरीसाठी पात्र ठरला आहे आणि सप्टेंबरमध्ये अमेरिकेत ही होणार आहे.
नुकत्याच पार पडलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत मुरलीला अंतिम फेरीची पात्रता पटकावता आली नव्हती. ८.४१ मीटर ही वैयक्तिक व सत्रातील सर्वोत्तम कामगिरी नावावर असलेल्या मुरलीला जागतिक स्पर्धेत ७.७४ मीटर लांब उडी मारता आली आणि तो २२व्या क्रमांकावर राहिला होता. आज डायमंड लीगमध्ये पहिल्या प्रयत्नात त्याने ७.९९ मीटर लांब उडी मारून पहिले स्थान पटकावले. दुसऱ्या प्रयत्नात ग्रीसच्या मिल्टीआदीस तेंटोग्लोऊने ८.०४ मीटर लांब उडी मारली. मुरलीचा दुसरा प्रयत्न ७.९६ मीटर राहिला. मुरलीचा तिसरा प्रयत्न अयशस्वी राहिला.
मुरलीने चौथ्या प्रयत्नात ७.९६ मीटर लांब उडी मारली. जमैकाच्या तजेय गेलने ८.०७ मीटर लांब उडी घेत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली. मुरलीचा पाचवा प्रयत्न ( ७.९३ मी.) फार खास नाही राहिला. अमेरिकेच्या जेरियन लॉसनने ८.०५ मीटर लांब उडी मारून थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आणि त्यामुळे भारतीय खेळाडूची पाचव्या स्थानी घसरण झाली. गेलने सहाव्या आणि शेवटच्या प्रयत्नात ८.०६ मीटर लांब उडी मारून अव्वल स्थान कायम राखले होते, परंतु ग्रीसच्या तेंटोग्लोऊनने ८.२० मीटर लांब उडी मारली अन् सर्वांना मागे टाकून टॉपर ठरला.