माद्रिद : अलेक्झेंडर ज्वेरेवने फ्रेंच ओपनपूर्वी शानदार फॉर्म कायम राखताना मॅटियो बेरेटिनीचा पराभव करीत दुसऱ्यांचा माद्रिद ओपन टेनिस स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळविला.उपांत्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित राफेल नदालचा व उपांत्य फेरीत चौथ्या मानांकित डॉमनिक थीमचा पराभव केल्यानंतर ज्वेरेवने फायनलमध्ये १० व्या मानांकित बेरेटिनीचा ६-७ (८), ६-४, ६-३ ने पराभव करीत मोसमातील दुसरे जेतेपद पटकावले.जर्मनीच्या सहाव्या मानांकित खेळाडूने मार्चमध्ये अकापुल्कोमध्ये मेक्सिकन ओपनचे जेतेपद पटकावले होते. त्याने यापूर्वी २०१८ मध्ये थीमचा पराभव करीत प्रथमच माद्रिद ओपनमध्ये जेतेपद पटकावले होते.२४ वर्षीय ज्वेरेव म्हणाला,‘फ्रेंच ओपनमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी तुम्हाला क्ले कोर्टवर शानदार कामगिरी करणे आवश्यक असते. शेवटी मी मास्टर्सचे जेतेपद पटकावले. त्यामुळे माझ्यासाठी हे विजेपद महत्त्वाचे आहे. मी या उपलब्धीमुळे खूश आहे.’पुरुष दुहेरीच्या फायनलमध्ये स्पेनच्या मार्सेल ग्रेनोलर्स व अर्जेंटिनाचा होरासियो जेबालोसने क्रोएशियाच्या निकोला मेटकिच व मॅच पाविच यांचा १-६, ६-३, १०-८ ने पराभव करीत जेतेपद पटकावले.
ज्वेरेव दुसऱ्यांदा माद्रिद ओपनचा मानकरी, अंतिम लढतीत बेरेटिनीवर केली मात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 6:06 AM