हाले : जर्मनीचा १९ वर्षीय युवा खेळाडू अलेक्झांडर झ्वेरेव याने तब्बल आठ वेळच्या विजेत्या व अव्वल मानांकित रॉजर फेडरर याला हाले ग्रासकोर्ट टुर्नामेंटच्या उपांत्य लढतीत पराभवाचा धक्का देण्याची किमया केली आहे. झ्वेरेव याने तब्बल २ तास ६ मिनिटे चाललेल्या या लढतीत फेडरर याच्यावर ७-६ (४), ५-७, ६-३ अशी मात केली. आॅस्ट्रियाचा डॉम्निक थियेम व फ्लोरियन मायेर यांच्यातील विजेत्याशी झ्वेरेव याची अंतिम फेरीत गाठ पडेल. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या फेडररला जागतिक क्रमवारीत ३८ व्या स्थानी असलेल्या झ्वेरेव याने मात दिली. अशी धक्कादायक कामगिरी करणारा तो चौथा ‘टीन एजर’ ठरला आहे. आपल्या खेळीविषयी बोलताना झ्वेरेव म्हणाला, ‘‘माझा आजचा खेळ खूपच चांगला झाला. मोक्याच्या क्षणी मी अधिक चांगला खेळ करू शकलो. खरे तर फेडररला ग्रास कोर्टावर नमविणे अविश्वसनीय आहे.’’ यापूर्वी दुबई ओपनमध्ये बोर्ना कोरिक या टीन एजरने २०१५ मध्ये त्यावेळच्या तिसऱ्या मानांकित अॅण्डी मरे याला मात दिली होती, तर २०१४ मध्ये बासेल स्पर्धेत पुन्हा बोर्ना कोरिकने त्यावेळच्या तिसऱ्या मानांकित राफेल नदाल याला नमविले. विम्बल्डन स्पर्धेत (२०१४) निक किर्गियोस या टीन एजरने त्या वेळच्या अव्वल मानांकित नदालला पराभूत करण्याची कामगिरी केली होती. (वृत्तसंस्था)
झ्वेरेवने फेडररला नमविले
By admin | Published: June 19, 2016 4:23 AM