- राखी कुलकर्णी
मी दोन वर्षापूर्वी ऑफिसच्या लोकांसोबत पॉँडेचरीला गेले होते. ती दहा दिवसांची सहल होती. तेव्हा खूप छान वाटलं आणि वाटलं आपण भारतभर का फिरू नये? तशा यापूर्वीही मी छोटय़ा छोटय़ा ट्रिप केल्या होत्या. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी फिरले होते; पण एकटीनं एवढी मोठी सोलो ट्रिप?पण ठरवलं जायचंच. मग मी घरी सांगितलं की, मी भारतभर फिरायला जाणार आणि एकटीच जाणार आहे. हा निर्णय ऐकून घरच्यांना खरं तर खूप गंमत वाटली. त्यांना वाटलं मी असंच सहज बोलतेय. काय करणार फिरून असंही त्यांनी मला विचारलं. मग मी त्यांना माझा उद्देश सांगितला. माझा संपूर्ण प्लॅन समजावून सांगितला. मग घरच्यांनी मला पाठिंबा दिला. खरं तर घरच्यांमुळे मी जाऊ शकले. त्याबाबतीत मी खूप लकी आहे. मात्र ट्रिपला जायचं म्हटल्यावर खूप पैसे लागणार होते. त्यासाठी कोणतीही स्पॉन्सरशिप नव्हती. त्यामुळे मीच दोन वर्षे पैसे जमा केले. जवळपास तीन ते साडेतीन लाख रुपये जमवले. आणि पैसे जमल्यावर मी प्रवासाला निघाले. अर्थात माझा संपूर्ण प्रवास अडीच लाखांमध्येच झाला. कारण स्थानिक लोकांनी खूप मदत केली. माझ्या ट्रिपची सुरुवात कर्नाटकात झाली. तिथं खरं तर काहीच अडचण आली नाही. कारण मला कानडी येतं. दक्षिणेत मी अनेकदा गेल्यानं मला तिथलं सर्व माहीत होते. पदार्थही सवयीचेच होते; पण ईशान्य भारतात जरा अडचण आली, तिकडे मांसाहार जास्त त्यामुळे जेवणाची आबाळ झाली. मी अगोदर अनेक संस्थांसाठी स्वयंसेवक म्हणून नाव नोंदवलं होतं. त्या संस्थांसोबत मी त्या त्या ठिकाणी काम केलं की राहण्याची आणि खायची सोय होत होती. असंच पंजाबमध्ये मी एका शाळेत गेले. तिथे मला शिकवायचं काम दिलं गेलं. त्यानंतर हिमाचल प्रदेशमध्ये सफरचंद तोडायचं काम केलं. मी ते काम तीन ते चार दिवस केलं. त्यातून जेवायला आणि राहायला मिळालं. स्थानिक लोकांसोबत राहिल्याने आनंद मिळाला. चिटकुल हे गाव हिमाचलमध्ये आहे. खूप सुंदर गाव आहे. आपल्या देशाच्या सीमेवरील ते शेवटचे गाव. तिथून पुढे चीनची सीमा सुरू होते. तिथं सैनिक भेटले. त्याचं जगणं समजलं.कोलकात्याला होते तेव्हा मी सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांना माझ्या प्रवासाबाबत ई-मेल केला होता. तेव्हा त्यांनी स्वतर् मला फोन करून माहिती घेतली. सिक्कीमला गेल्यानंतर त्यांच्याकडे राजभवनमध्ये राहायला मिळालं. मी पायी चालत आहे, हे समजल्यावर त्यांनी मला फिरायला गाडी दिली. त्यांच्याकडे खूप दिवसांनी मराठी जेवणाचा आस्वाद घेता आला. गुजरातमध्ये गांधी भवनला राहिले. तेथे कचरावेचकांसोबत मी काम केलं. खरं तर त्यांच्यासोबत अर्धा तासच काम करू शकले. कारण दरुगधीत काम करणं किती अवघड असतं हे मला उमगलं. तिथे कचरा वर्गीकरण केलं जायचं; परंतु या कचर्यात महिला आठ ते नऊ तास काम करतात. एवढा वेळ काम करूनही या महिलांना शंभर ते दीडशे रुपये हातात मिळतात. त्यांना पाहून आपण किती बिनधास्तपणे कचरा तसाच टाकून देतो, याचं वाईट वाटलं. अजून एक वेगळा अनुभव म्हणजे भारतीय म्हणून ‘कनेक्ट’ होण्याचा. काश्मीरमध्ये कूपवाडामध्ये राहात असताना तेथील जवानांनी माझी आपुलकीनं चौकशी केली. मला काही अडचण आली तर लगेच सांग म्हणून स्वतर्चे मोबाइल क्रमांक दिले. कधीही, कुठेही काही लागले तर सांग असं ते म्हणाले. मात्र भीती वाटली तरी या देशात फिरण्याचा धीरही माझा वाढला.पं. बंगालमध्ये एकदा माझी ट्रेन लेट झाली आणि मला रात्नी दोन वाजता प्लॅटफॉर्मवर झोपावं लागलं. तिथे कोणीही ओळखीचं नव्हतं. माझ्याकडे अधिक पैसे नसल्याने मी मोठय़ा हॉटेलमध्ये जाऊन राहू शकत नव्हते. भीती वाटली पण निभावले. तेच अरुणाचल प्रदेशमध्ये एका ठिकाणी मी चुकले. तिथे वाहतुकीची साधनंही खूप कमी असतात. त्यामुळे मी ज्या ठिकाणी उतरले त्या ठिकाणापासून मला 12 ते 14 किलोमीटर चालत जायचं होतं. आसपास तर कोणीही नव्हतं. काय करावं ते कळत नव्हतं. पाठीवर 22 किलोची बॅग होती. मी अक्षरशर् अर्धा तास रडत होते; पण तशीच मी पुढे चालत गेले आणि त्या गावात पोहोचले, तेव्हा तिथलं स्वागत पाहून माझी भीती पळून गेली. हे अपवाद एरव्ही प्रवासात अनेकांनी मदत केली, धीर दिला. ट्रिपहून मी घरी आले. अनुभवसंपन्न वर्ष जगले होते. त्यामुळे ऑफिसमध्ये जाऊन पुन्हा कॉम्प्युटरसमोर बसताना मला काही दिवस फार अवघड गेलं. अख्खा भारत फिरल्यावर नुसतं बसून राहणं जडच जाणार होतं. मात्र आता तेही जमतंय.या ‘सोलो जर्नी’नं मला खूप श्रीमंत केलं हे नक्की!
****
कंपनीनं दिली वर्षभराची सुटी मी एका कंपनीत फायनान्सचं काम करते. मी वर्षभरासाठी ट्रिपला जाणार आहे, असं ऑफिसमध्ये सांगितलं. एक वर्ष सुटी मिळणं अवघड होतं. म्हणून मी वरिष्ठांना राजीनामा देणार असल्याचं सांगितलं. तेव्हा वरिष्ठांनी मला तू परत आल्यावर काय करणार असं विचारलं. मी म्हटलं, कुठंतरी जॉब करेन. तेव्हा त्यांनी मला एक वर्षाची सुटी आम्ही तुला देतो, असं सांगितलं. त्यामुळे मला बिनधास्तपणे फिरता आलं. परत आल्यावर जॉब नसेल, याचं टेन्शन राहिलं नव्हतं.
29 राज्यं नव्हे; 29 संस्कृती आपला भारत खूप समृद्ध देश आहे. 29 राज्यं म्हणजे 29 संस्कृती असलेले देशच आहेत. बॅग पॅक करून आपला देश आधी बघितला पाहिजे.
प्लॅस्टिकबाबत जनजागृती सध्या प्लॅस्टिकचं प्रदूषण खूप होत आहे. त्यामुळे मी या प्रवासात प्लॅस्टिक कमी वापरून त्याविषयी जनजागृती करण्याचा प्रय} केला. वर्तमानपत्नाच्या कागदाची पिशवी कशी तयार करायची, याचं प्रशिक्षण मी अनेक शाळा, महाविद्यालयांतील विद्याथ्र्याना दिलं. त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला.
महिलांच्या स्वच्छतागृहांना कुलुपं..बर्याच ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहं होती; परंतु त्यांना कुलुपं होती. काही रेल्वे स्टेशनवर तर महिला आहेत म्हणून स्वच्छतागृहासाठी अधिक पैसे घेतले. मला सगळीकडे ही एक मोठी समस्या जाणवली.
घराबाहेर जगच नाही..काश्मीरमधील एका घरातील मुलीशी मी बोलले, तेव्हा तिनं मला विचारलं की, कुठून आलात. मी म्हटलं पुण्याहून आले आहे. पुणे काय किंवा महाराष्ट्र काय हे तिला माहीत नव्हतं. कारण ती घराबाहेरच पडली नव्हती. तिला काश्मीरची राजधानी श्रीनगर आहे, हेदेखील माहीत नव्हतं. खरं तर महिलांनी घराबाहेर पडावे आणि फिरावं यासाठीच मी माझा ‘सोलो जर्नी’ केला आहे.
शब्दांकन - श्रीकिशन काळे