- कलीम अजीम
दहा वर्षाचा रोमिओ कॉक्स तीन महिने आणि 2,800 किलोमीटरचा पायी प्रवास करत इटलीहून लंडनला पोहोचला. आजी रोज मेरीला भेटायचं म्हणून त्यानं वडिलांसह हा प्रवास केला. इटली ते लंडन, पायी प्रवास. त्या प्रवासाचा प्रत्येक क्षण आणि प्रसंग फोटो आणि व्हिडिओ स्वरूपात त्याच्या वडिलांनी कॅम:यात टिपले आहे. दहा वर्षाच्या मुलाची ही सफर तिकडे तरुणांच्या जगात मोठय़ा चर्चेचा विषय बनली आहे. कॉक्स म्हणतो, ‘टाळेबंदीत फ्रान्सहून इटलीत चालत आलेली एक वयस्कर आजी मी पाहिली. मला वाटलं ती जर हे करू शकते तर मी का नाही? मलाही माङया आजीला भेटायला लंडनला जायचं होतं.’
पण दोन्ही देशात लॉकडाऊनुमळे वाहतुकीवर र्निबध होते. जाणार कसं? वडिलांना तो म्हणाला पायी जाऊ, पण वडील तयार नव्हते. पण मुलगा ऐकेनाच म्हटल्यावर तेही त्याच्यासोबत निघाले. दोघांचं पहिलं डेस्टिनेशन मेसिना होतं. आईनं त्या दिशेनं कॉक्सला चालत नेलं. निरोप दिला.पिता-पुत्र 24 जूनला इटली - सिसिलीहून नेपल्सला जाणारी बोट घेऊन निघाले. पुढे सायकलवरून त्यांचा लांबचा प्रवास सुरू झाला. रोज पहाटे साडेचार वाजता उठून प्रवास सुरू व्हायचा. कॅन्टरबरीहून रोमला जोडणा:या फ्रान्सिजेना मार्गावर ही जोडी दिवसाला सुमारे 2क् किलोमीटर प्रवास करत असे.जिथे रात्र होईल तिथे त्यांचा मुक्काम होई. अनेकदा त्यांनी निरभ्र चांदण्याच्या खाली जंगलात तळ ठोकला. प्रवासात वसतिगृहं आणि कॉन्व्हेंटमध्येदेखील मुक्काम पडला. कॉक्स म्हणतो, ‘आम्ही तारे आणि झाडांखाली कुठेही झोपायचो. ते खरोखरच चांगले दिवस होते.’हा प्रवास साधा नव्हता. प्रवासात गाढव, घोडा, मिळेल त्या वाहनावर बॅगा सांभाळत बसावं लागायचं. तब्बल 93 दिवस ते रस्त्यावर प्रवास करत होते. यादरम्यान दोघांनी इटली ते इंग्लंडदरम्यान चार देश ओलांडले. अर्थात, लंडनला पोहोचल्यावर 14 दिवस नियमानुसार क्वॉरण्टाइन व्हावंच लागलं आणि मग 5 ऑक्टोबरला कॉक्स त्याच्या आजीला भेटला. या दिवशी मीडिया प्रतिनिधींनी दोघांच्या भावमुद्रा टिपण्यासाठी गर्दी केली होती. ते व्हिडिओही व्हायरल झाले.
कॉक्सचे वडील फिल कॉक्स व्यवसायानं पत्रकार व माहितीपट दिग्दर्शक आहेत. ते एका सेवाभावी संस्थेसाठी समाजकार्य करतात. मुलाच्या धाडसाचे कौतुक म्हणून त्यांनी त्याच्यासोबत हा पायी प्रवास केला. लॉकडाऊनमुळे निर्वासितांनी केलेल्या वेदनादायी पायपिटीवरही त्यांनी आपल्या या प्रवासातून भाष्य केलं. कोरोनाकाळात देश ओलांडत चालत जात आपल्या माणसांना भेटणं हे जगभरातल्या माणसांनी कसं अनुभवलं याची ही गोष्ट आहे. ( कलीम मुक्त पत्रकार आहे.)