- कलीम अजीम
सलिमा मजारी अफगाणिस्तानातल्या बलाख जिल्ह्याच्या कलेक्टर. नियुक्तीच्या पहिल्या दिवशी सुरक्षेसाठी त्यांना दोन गार्ड आणि एक जुनं एके ४७ देण्यात आलं. गन सुरू आहे का नाही याची चाचणी घ्यायचं त्यांनी ठरवलं. गार्डसह त्या डोंगराळ भागात गेल्या. स्वत: ट्रिगर ओढलं.
बंदुकीतून निघणाऱ्या कानठळ्या बसणाऱ्या आवाजानं त्या भानावर आल्या. पस्तिशीतल्या सलिमा ‘दि नेशनल’ या अरब वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगतात, ती बंदूक हातात घेतल्यावर वाटलं की किती विनाश करते ही, हे चित्र बदलता नाही का येणार? तिथून त्यांनी प्रयत्न सुरू केले आणि आजवर सलिमा मजारी यांनी तब्बल १२५ तालिबानींना कायमचं शस्र खाली ठेवण्यास भाग पाडलं.
सलिमा इराणमध्ये जन्मलेल्या अफगाण शरणार्थी. इराणचं आयुष्य सोडून तीन वर्षांपूर्वी त्या मायदेशी परतल्या. निर्वासितांचा डाग माथी घेऊन मरायचं नाही, असा त्यांचा संकल्प. पती व मुलासह त्यांनी २०१८ला अफगाणिस्तान गाठलं. मजार-ए- शरीफ शहरातील एका खासगी विद्यापीठात त्यांना प्रशासकीय पदावर नियुक्ती मिळाली. नोकरी करता करता त्यांनी सिव्हिल सर्व्हिसेसमधून चारकिंट जिल्ह्याच्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नरपदासाठी अर्ज केला. अभ्यास व जोडीला विविध अस्थापनांतील व्यवस्थापकीय अनुभवाच्या जोरावर त्या निवडल्या गेल्या. अशारीतीने सलिमा उत्तर प्रांतातील बलाख शहराच्या पहिल्या महिला गव्हर्नर म्हणजे कलेक्टर ठरल्या.
स्टॅटर्जी व नियोजन करून त्यांनी तालिबानी बंडखोरांचा मुकाबला केला. फ्रंट लाइनवर राहून त्यांनी बंडखोरांना आव्हान दिलं. कलेक्टरच्या नेतृत्वात ग्रामस्थांनी स्वत:ला सशस्र केले आणि अनेक तालिबानी हल्ले रोखले. अनेक रहिवाशांनी या युद्धात सामील होण्यासाठी व शस्रासाठी पैसे जमवण्याकरिता त्यांचं पशुधन विकलं. मात्र सशस्र हिंसेऐवजी त्यांनी शांततेच्या मार्गाने वाटाघाटी सुरू केल्या. महिनाभरापूर्वी प्रदेशातील एका खेड्यावर तालिबान्यांनी हल्ला केला. त्यात महिला आणि लहान मुलांचा बळी गेला. परिणामी ग्रामस्थांनी कर भरणे थांबवले. जीवंत राहिलेल्यांना बदला घ्यायचा होता; परंतु सलिमा यांनी चर्चा घडवून आणून पुढचा अनर्थ टाळला.
गावातील बुजुर्ग आणि धार्मिक नेत्यांमार्फत त्यांनी तालिबानी बंडखोरांना संदेश पाठविला आणि सामूहिक शांततेचं आवाहन केलं. या त्यांच्या प्रयत्नांचा परिणाम म्हणून, तब्बल १२५ तालिबानांनी गेल्या महिन्यात आत्मसमर्पण केलं. त्यात बहुतेक बंडखोर हे तरुण आहेत. त्यांचे ब्रेन वॉश करण्यात आलं होतं; पण योग्य ब्रेन वॉश तर सलिमा मजारी यांनी केलं अशी कबुली या तरुणांनी दिली आहे. सलिमा मजारी यांनी एक प्रशासक म्हणून हा बदल घडवून आणला आहे. बदलांची ही सुरुवात आश्वासक आहे..
(कलीम मुक्त पत्रकार आहेत.)
kalimazim2@gmail.com