- संदीप आडनाईक
व्हीआयटीत शिकणार्या विद्यार्थ्यांनी स्वीकारलंय एक नवीन चॅलेंज!
तमिळनाडूच्या वेल्लोर येथील वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये (व्हीआयटी) शिकणारा कोल्हापूरचा अखिलेश आश्विन भोसले. एक लिटर पेट्रोलमध्ये २00 पेक्षा जास्त किलोमीटर धावू शकणारी कार डिझाइन करण्याचं आव्हान त्याच्या टीमनं स्वीकारलं असून, ‘शेल’मार्फत आशियास्तरावर होणार्या इको मॅरेथॉन स्पर्धेत त्याची भारताकडून एण्ट्रीही दाखल करण्यात आली आहे.
भूगर्भातील पेट्रोलचे साठे कधीतरी संपणार आहेतच, तेव्हा त्यावर पर्याय शोधण्यासाठी जगभरातील ऑटोमोबाइल क्षेत्रातील तज्ज्ञ आणि संशोधक सध्या विचार करीत आहेत. जागतिक विद्यापीठे, संशोधन क्षेत्रात काम करणार्या संस्था कमीत कमी इंधनात चालणार्या अत्याधुनिक कार, दुचाकी आणि इतर वाहने तयार करण्यासाठी संशोधन करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून शेल या आंतरराष्ट्रीय कंपनीमार्फत घेण्यात येणार्या शेल इको मॅरेथॉन या स्पर्धेत वेल्लोरच्या व्हीआयटी विद्यापीठाच्या इको टायटन्स संघाच्या चमूने भाग घेतला आहे. प्रॉडक्शन अँण्ड इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी यात सहभागी झाले आहेत. या इको मॅरेथॉन एशिया स्पर्धेसाठी भारताकडून दरवर्षी तीन संघ प्रतिनिधित्व करतात. त्यात व्हीआयटीचाही समावेश असतो. मार्च २0१७ मध्ये सिंगापूर येथे या स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतातून जवळजवळ ३0हून अधिक महाविद्यालयांनी एण्ट्री दाखल केली असून, त्यातील तीन संघ निवडण्यात येणार आहेत. व्हीआयटी हे निवडण्यात आलेले पहिले विद्यापीठ आहे.
कोल्हापूरचा अखिलेश भोसले व्हीआयटीमध्ये दुसर्या वर्षाला शिकत असून, तो या टीमचा भाग आहे. २0१0 पासून या कार निर्मितीसाठीचे संशोधन व्हीआयटीमध्ये सुरू केल्याचे अखिलेश भोसले यांनी सांगितले. या प्रकल्पामध्ये विद्यापीठातील ४0 विद्यार्थी संशोधकांचा समावेश आहे. यात नागपूरचा विद्यार्थी निपुण बेले याच्यासह कोल्हापूरचा अखिलेश हे दोन विद्यार्थी महाराष्ट्रीयन आहेत. सुरुवातीला प्रतिलिटर ४0 कि.मी. इतके गाडीचे अँव्हरेज होते, मात्र गेल्या वर्षी ते २00 किलोमीटर करण्यात या विद्यार्थ्यांना यश आले. २0१६-१७ या वर्षात हेच अँव्हरेज २00 पेक्षाही जास्त करण्याचे या विद्यार्थ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकल्पाचा एकूण खर्च १३ लाखांच्या आसपास असून, विद्यार्थी आणि प्रायोजक यांच्याकडून रक्कम उभी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या कारचे पेटंट कायमस्वरूपी विद्यापीठाच्याच नावाने राहणार आहे. या स्पर्धेत भाग घेतल्यामुळे हे पेटंट कोणालाही विकता येत नाही.
इंजिन ५00 सीसी फोरस्ट्रोक
या स्पर्धेसाठी बनविण्यात येत असलेल्या या कारचे वैशिष्ट्य म्हणजे या कारची संपूर्ण बॉडी ही कार्बन फायबर रिइन्फोस्र्ट पॉलिमरपासून बनविण्यात आली आहे. यात वेगवेगळ्या रसायनांचाही वापर केला आहे. यामुळे कारचे वजन हलके राहणार आहे. याशिवाय इंजिन ५00 सीसी फोरस्ट्रोक असून, त्याचे गिअर्स स्वयंचलित आहेत. गाडीला लागणारे नट, बोल्ट स्टीलचे न वापरता नॉयलॉनचे वापरलेले आहेत. या कारचे बेअरिंग र्जमनीहून, तर इंजिन चीनहून मागविण्यात आले आहे. इलेक्ट्रॉनिक फ्यूएल इंजेक्शन तंत्रज्ञानाचा यात वापर केला गेला असून, गाडीचा आकार हा पाण्याच्या थेंबासारखा आहे. यामुळे या कारला ‘टिअर ड्रॉप शेप’ असे नाव देण्यात आले आहे. गाडीच्या इंजिन आणि असेंब्लीचे काम पूर्ण झाले असून, बॉडीचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर विद्यापीठ परिसरात गाडीचे टेस्टिंग केले जाणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व विद्यार्थी कसून मेहनत घेत आहेत. विविध पुस्तके, आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिका, ऑनलाइन आर्टिकल्स वापरून ही कार तयार केली जात आहे.